महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी शहरात निवड चाचणी
सीआरएस नोंदणी करुन निवड चाचणीत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. भुईकोट किल्ला मैदान येथे रविवार (दि.16 जून) पासून दुपारी 4:30 वाजता या निवड चाचणीला प्रारंभ होणार असून, या चाचणीद्वारे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल संघ व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
असोसिएशनचे सचिव रोनप ॲलेक्स फर्नांडिस यांच्या उपस्थितीत 18 खेळाडूंची संघात निवड होणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरचे आयोजन करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होत आहे.
यामध्ये 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर 31 डिसेंबर 2010 च्या पूर्वी जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, सीआरएस नोंदणी न केलेल्या खेळाडूंना निवड चाचणीत खेळता येणार आहे. खेळाडूंना त्यांचा मूळ जन्म प्रमाणपत्र किंवा सोबत आधारकार्ड किंवा पासपोर्ट आणणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी राजू पाटोळे, प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, वैभव मनोदिया आदी प्रयत्नशील आहेत.