अहमदनगर (प्रतिनिधी)-
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत युवक-युवतींचा सहभाग महत्त्वाचा आहे. 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आलेल्या भारतात सर्व नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करणे आवश्यक आहे. शंभर टक्के मतदान झाल्यास खर्या अर्थाने सक्षम व जनमतातून लोकप्रतिनिधी निवडून येणार आहे. तर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकास साधला जाणार असल्याची भावना प्रा. मारुती शेळके यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व मास्टर माईंड करिअर अॅकेडमीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बालिकाश्रम रोड येथे मतदार जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना मास्टर माईंड करिअर अॅकेडमीचे प्रा. शेळके बोलत होते. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, अॅकेडमीचे प्रा. अमोल सायंबर, प्रा. अनिल तोडमल, प्रतिभा डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, शहरात सुशिक्षित वर्ग असून देखील शंभर टक्के मतदान होत नाही. सुशिक्षित नागरिक देखील मतदान प्रक्रियेत उदासीनता दाखवितात. सुशिक्षित युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपले नांव मतदार यादीत नोंदवून मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. अमोल सायंबर यांनी मतदानासाठी युवावर्गाने स्वतःहून पुढाकार घेतला तर खर्या अर्थाने लोकशाही सदृढ होणार आहे. चारित्र्यसंपन्न चांगल्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास साधला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमास उपस्थित महाविद्यालयीन युवक-युवतींना पाहुण्यांच्या हस्ते मतदार यादीत नांव समाविष्ट करणे व मतदान करण्याबातची मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्याचा संकल्प व्यक्त केला. आभार संदिप डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.