विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- ह्रद्याचा ठोका चुकवित विविध डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा गाजवली. शनिवारी (दि.17 ऑगस्ट) मुलींच्या चित्त थरारक कुस्ती स्पर्धा निमगाव वाघा (ता. नगर) येथील न्यू मिलन मंगल कार्यालयात पार पडली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळ करणारे मुलींमध्ये श्री नृसिंह विद्यालय (चास) च्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी जनरल चॅम्पियनशिप चषक पटकाविला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नगर तालुका क्रीडा समिती, नगर तालुका तालिम सेवा संघ व नवनाथ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला नगर तालुक्यातील महिला कुस्तीपटूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच साहेबराव बोडखे यांच्या हस्ते मुलींच्या कुस्त्या लावून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा महाराष्ट्र केसरी पै. विष्णू खोसे, दिलावर शेख, नगर तालुका तालिम सेवा संघाचे उपाध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव बाळासाहेब भापकर, पंच पै. गणेश जाधव, पै. मल्हारी कांडेकर, आशिष आचारी, मिलिंद थोरे, बबन शेळके, पै. विकास निकम, दत्तात्रय भापकर, आर.एम. कोकाटे, पी.एस. शिंदे, शिवाजी खामकर आदींसह शालेय महिला कुस्तीपटू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलींनी एकापेक्षा एक सरस डावपेचांनी आपल्या उत्कृष्ट कुस्त्यांचा खेळ सादर केला. ही स्पर्धा 14, 17 व 19 वयोगटात पार पडली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलींच्या खेळाला दाद दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या महिला कुस्तीपटूंना रोख बक्षिसे देण्यात आले. मुला-मुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरवर्षी कुस्ती स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करुन खेळाडूंना रोख बक्षिसे व जनरल चॅम्पियनशिप चषक प्रदान करुन खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा युवा महाराष्ट्र केसरी पै. विष्णू खोसे, पै. मल्हारी कांडेकर, पै. गणेश जाधव व पै. बाळासाहेब भापकर यांनी त्यांचा सत्कार केला. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या 14, 17, 19 वयोगटातील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय स्पर्धा दादा पाटील महाविद्यालय ता. कर्जत येथे होणार आहे.
–
नगर तालुका विजेत्या खेळाडूंची व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे:-
14 वर्ष वयोगट मुली फ्रीस्टाईल विजयी- वैष्णवी भोसले (सारोळा कासार), स्वराली कार्ले (नृसिंह विद्यालय, चास), प्रेरणा मुठे (नृसिंह विद्यालय, चास), ज्ञानेश्वरी काळे (नृसिंह विद्यालय, चास), गायत्री खामकर (बाणेश्वर विद्यालय, बुऱ्हाणनगर), तेजस्विनी गारुडकर (नृसिंह विद्यालय, चास), किर्ती जाधव (नवनाथ विद्यालय, निमगाव वाघा).
17 वर्ष वयोगट मुली फ्रीस्टाईल विजयी- सानिका हजारे (चिचोंडी पाटील), सिध्दी होले (नृसिंह विद्यालय, चास), समिक्षा साळवे (भिंगार), अनुष्का मेहेत्रे (नृसिंह विद्यालय, चास), गायत्री कार्ले (नृसिंह विद्यालय, चास), भाग्यश्री वाळूंज (नृसिंह विद्यालय, चास), समिक्षा कार्ले (नृसिंह विद्यालय, चास).
19 वर्ष वयोगट मुली फ्रीस्टाईल विजयी- धनश्री खाडे (हनुमान विद्यालय, टाकळी खातगाव), प्रणाली आमले (नृसिंह विद्यालय, चास).