डॉ. बबनराव तायवाडे यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबात विक्रम ढोणे यांची प्रतिक्रिया
सांगली प्रतिनिधी – राज्य मागासवर्ग आयोगाचे समाजशास्त्रज्ञ डॉ. बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देण्याबाबत केलेल्या घोषणेमुळे आयोगाच्या स्थापनेतील फोलपणा समोर आला आहे. तायवाडे हे आयोगावरील समाजशास्त्रज्ञ पदासाठी पात्रच नव्हेत, यासंबंधीचा लेखी आक्षेप आम्ही नोंदवला आहे. त्यामुळे त्यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
डॉ. तायवाडे यांनी आपला निर्णय नागपूरमधून जाहीर करत असताना, ओबीसींना राजकीय आरक्षण देऊ शकत नसल्याने राजीनामा देणार असल्याची सांगितले आहे. वस्तुतः त्यांना पात्रतेच्या अभावामुळे हे पद आज ना उद्या सोडावेच लागले असते, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.
ढोणे यांनी पाठीमागील आठवड्यात पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य मागासवर्ग आयोगावरील सदस्यांच्या नेमणुकीत गडबड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे, तसेच सदस्यांचा व्हेरिफाईड डेटा जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. सद्या आयोगावर असलेले काही सदस्य त्या पदासाठी पात्र नाहीत, तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, चारित्र्य पडताळणी झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मागण्यासंदर्भात २ ऑक्टोंबरपासून पुणे येथील प्रशासकीय भवनात असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर ते उपोषणाला बसणार आहेत.
यासंदर्भाने, तायवाडे हे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांचे कॉमर्स शाखेतील शिक्षण आहे. त्यांचा समाजशास्राशी संबंध नाही. महत्वाची बाब म्हणजे आयोगाचे सदस्य म्हणून ते तटस्थ नाहीत. २६ व २७ जून २०२१ रोजी लोणावळा जि. पुणे येथे झालेल्या ओबीसी चिंतन परिषदेवेळी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगासंबंधीची भुमिका स्पष्ट केलेली आहे. आपले प्राधान्य ओबीसींना आहे, आयोगाला नाही, असे सांगत आयोगाचे सदस्यपद सोडण्याची तयारी त्यांनी बोलून दाखवली आहे. या पदाचे, जबाबदारीचे गांभीर्य त्यांना नाही, हे यावरून स्पष्टपणे दिसते आहे, असे ढोणे यांनी आपल्या आक्षेपात म्हटलेले आहे.
यापार्श्वभुमीवर तायवाडे यांनी ओबीसींनी आरक्षण देऊ शकत नसल्याचे कारण सांगून राजीनामा देणार असल्याचे नुकतेच म्हटले आहे. मात्र तायवाडे हे पदाला पात्र नव्हते, ते समाजशास्रज्ञ नसल्याने ते पदाला न्याय देऊ शकले नसते. त्यामुळे महाराष्ट्राचे व पर्यायाने ओबीसींचे नुकसान झाले असते, अशी प्रतिक्रिया ढोणे यांनी दिली आहे. या प्रकारावरून राज्य शासनाने नेमलेल्या आयोगातील फोलपणा स्पष्ट झालेला आहे. तायवाडे यांच्यासारख्या पात्रता नसलेल्या व्यक्तीला सरकारने संधी दिली होती, त्यामुळे राज्य शासनाने वेळीच सदस्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे ढोणे यांनी सांगितले.
२ ऑक्टोंबरचे उपोषण होणार
डॉ. तायवाडे यांनी राजीनामा द्यावा किंवा न द्यावा, पण सदस्यांचा व्हेरीफाईड डेटा जाहीर झाला पाहिजे, अपात्र सदस्यांना वगळले पाहिजे, नवीन पात्र सदस्यांना संधी दिली पाहिजे, अशी भुमिका घेऊन २ ऑक्टोंबरपासून पुण्यातील आयोगाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत आणखी काही अपात्र सदस्यांचे खरे रूप उघड होईल, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.