अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनातच विश्वाचे कल्याण आहे. वृक्षरोपण व संवर्धन करुन विश्व कल्याणाचे कार्य माजी सैनिक करीत आहे. सिमेवरील जवानांमुळे देश सुरक्षित आहे. तर माजी सैनिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेल्या पाऊलाने सजीव सृष्टी सुरक्षित राहणार असल्याचे प्रतिपादन महंत ह.भ.प. भगवान मचे महाराज यांनी केले.
अहमदनगर येथील माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने डमाळवाडी (ता. पाथर्डी) येथील तिर्थक्षेत्र हरेश्वर देवस्थानच्या गडावर वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी मचे महाराज बोलत होते. प्रारंभी महंत मचे महाराज, डमाळवाडीचे सरपंच रामनाथ शिरसाठ, कोल्हारचे सरपंच शिवाजी पालवे, उपसरपंच राजू गिते यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी माजी सरपंच अंबादास डमाळे, बाबाजी पालवे, महादेव गिते, समाजसेवक नंदू पालवे, विष्णु गिते, आजिनाथ पालवे, अॅड.संदिप जावळे, चेअरमन पोपट आव्हाड, सतिष विधाते, लक्ष्मण गिते, रोहीदास आव्हाड, सुखदेव आव्हाड, भरत शिरसाठ, ठकाजी गिते, भाऊसाहेब गिते, भानुदास पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, संतोष मगर, शिवाजी गर्जे, महादेव शिरसाठ, गोविंद वाडेकर, अॅड. शिवाजी डमाळे, बाबासाहेब गिते, संजय डमाळे, दगडू डमाळे, लक्ष्मण डोंगरे, मिठ्ठू गिते, गहिननाथ खेडकर, भाऊसाहेब डोंगरे, विष्णू डमाळे, हैशाबा डमाळे, पांडूरंग डोंगरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मचे महाराज म्हणाले की, लावलेल्या झाडांच्या माध्यमातून जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे कार्य अजरामर होणार आहे. त्यांनी सुरु केलेले वृक्षरोपणाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील डोंगर रांगा व तिर्थक्षेत्र असलेल्या मंदिर परिसरात वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेतंर्गत हरेश्वर देवस्थान परिसरात 30 वडाची व 50 फुलझाडे लावण्यात आले. सरपंच रामनाथ शिरसाठ यांनी हरेश्वर देवस्थान परिसरात लावण्यात आलेल्या झाडांमुळे शोभा वाढणार असल्याचे सांगून माजी सैनिकांचा सत्कार केला. आभार महादेव शिरसाठ यांनी मानले.