मिळालेल्या नवदृष्टीतून बजावणार मतदानाचे कर्तव्य
शस्त्रक्रिया होवून परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा संकल्प
फिनिक्स फाऊंडेशनची आगळी-वेगळी मतदार जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले. तर मदर डे निमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.
फिनिक्सच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे झालेल्या या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून 20 ज्येष्ठ नागरिक तर 25 महिलांवर मोतीबिंदू व काचबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया के.के. आय बुधराणी पुणे येथे करण्यात आल्या. नुकतेच शस्त्रक्रिया होऊन ज्येष्ठ नागरिक व महिला शहरात परतले असता फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी त्यांचे स्वागत करुन मिळालेल्या नवदृष्टीने मतदानाचा हक्क बजावण्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांनी देखील मिळालेल्या नवदृष्टीतून चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजाविण्याचा संकल्प केला.
आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी जिल्ह्यात फिनिक्स फाऊंडेशनने मोठी चळवळ उभी केली आहे. शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले जाते. फाऊंडेशनच्या माध्यमातून मतदार जागृती देखील करण्यात आली असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.