अमरापूर प्रतिनिधी – तालुक्यातील मौजे वडुले बु. येथील काळे वस्ती व गायकवाड वस्तीवरील ग्रामस्थांना सिंगल फेज योजनेची वीज मिळावी व गव्हाण वस्तीवरील डी.पी. क्र.१ & २ रोड लगत हलवून त्यामधील डी.पी. क्र.०२ बदलून मिळावी.अशा आशयाचे निवेदन म.रा.वि.वि.कं.शेवगाव उपविभागचे सहाय्यक अभियंता सी.एम.गायकवाड यांना जनशक्तीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे दिले.
यावेळी ज्ञानेश्वर सबलस, रमेश कबाडी, चंद्रकांत काळे, श्रीकृष्ण उगलमुगले, सुभाष टेकूळे, भाऊसाहेब पांजरे, संदीप डमाळ यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हंटले आहे की, मौजे वडुले बु. येथील काळे वस्ती व गायकवाड वस्तीवर ५०० हून अधिक लोक राहतात. सदरच्या वस्त्या गावापासून सुमारे ३ ते ४ कि.मी. अंतरावर आहेत. अद्याप या वस्तीवरील नागरिकांना सिंगल फेज योजनेचा वीज पुरवठा नाही.
सद्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि अशात वीज नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सिंगल फेज योजनेची वीज नसल्याने विद्यार्थ्यांची, ग्रामस्थांची व छोटया मोठ्या व्यवसायीकांची मोठी अडचण व कुंचबना होत आहे. सदरील वस्तीवरील नागरिक सिंगल फेजच्या विज कनेक्शनसाठी आपले मिटरचे कोटेशन भरण्यास तयार आहेत.त्यानुसार ग्रामस्थांकडून विजेचे कोटेशन स्विकारून संपूर्ण काळे वस्ती व गायकवाड वस्तीवर सिंगल फेज विज कनेक्शन तातडीने देऊन या परिसरातील विद्यार्थ्याची, व्यावसाईकांची व नागरिकांची होणारी अडचण तात्काळ दूर करावी.
तसेच येथील गव्हाणे वस्तीवरील डी.पी.वरून सध्या काळे वस्तीसाठी विद्युत पुरवठा होत आहे.ही डी.पी. ओढ्यालगत असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने खचलेली आहे.तसेच डी.पी.कडे जाण्यास रस्ता नसल्याने डी.पी.नादुरुस्त झाल्यास गैरसोय होते.त्यामुळे ती रस्त्यालगत हलवल्यास आपल्या कर्मचाऱ्यास दुरुस्तीसाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे गव्हाणे वस्तीवरील डी.पी.नं २ नादुरुस्त आहे.ती दुरूस्त करून मिळावी असेही निवेदनात म्हंटले आहे.