नक्षत्र प्राणायम परिवार व महापौर भगवान फुलसौंदर मित्र मंडळ यांच्यावतीने मोफत योग व आरोग्य साधना सप्ताहास प्रारंभ
योगा केल्याने शरीर तंदूरुस्त राहतेच परंतु मनावरही चांगले संस्कार होतात – भगवान फुलसौंदर
नगर – योगा केल्याने शरीर तंदूरुस्त राहतेच परंतु मनावरही चांगले संस्कार होऊन मन प्रसन्न राहते. भारतातील योगाची संस्कृती जागतिक पातळीवर स्वीकारली गेली असल्याने योगाचे महत्व लक्षात घेत नियमित योगा केला पाहिजे. यासाठी नक्षत्र प्राणायम परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत योगाचे महत्व पटवून देण्यासाठी मोफत योग व आरोग्य साधना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. नगर शहर निरोगी रहावे, यासाठी योग-प्राणायमा शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
फुलसौंदर मळा येथे नक्षत्र प्राणायम परिवार व प्रथम महापौर भगवान फुलसौंदर मित्र मंडळ यांच्यावतीने जागतिक योग दिनानिमित्त मोफत योग व आरोग्य साधना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, योगतज्ञ राहुल ठोकळ, कर्नल सोमेश्वर गायकवाड, अभय कटारिया, ज्ञानेश्वर काळे, विकास गिरी, रामकृष्ण आव्हाड, रघुनाथ केदार, शिवाजी मुळे, एस.टी.बोरुडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी कर्नल सोमेश्वर गायकवाड म्हणाले, निरोगी शरीर असेल तर विचारही निरोगी राहतात. यासाठी नियमित व्यायाम, योगा करणे आवश्यक आहे. आज आजाराला वयाचे बंधन राहिले नाही, कोणत्याही वयात आजार होऊ शकतात. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी योगाचे जीवनात फार महत्व आहे. त्याद्वारे रक्तदाब, रक्तातील साखर, हृदय विकार यावर योगाद्वारे नियंत्रण मिळू शकते. वयोमानानुसार नियमित आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली पाहिजे. तज्ञांचा सल्ला हा महत्वाचा आहे. प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी नक्षत्र प्राणायम परिवाराच्यावतीने या शिबीर आयोजनाचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे.
या सप्ताहांतर्गत दररोज सकाळी 6 ते 7 यावेळेत योग-प्राणायम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. यामध्ये किसन सेवा समितीचे उदय वाणे, युवा भारतचे अतुल आर्य, पंतजली योग समितीचे बाळासाहेब निमसे, मन:शक्तीचे विशाल ठोकळ, योग शिक्षक प्रकाश इवळे, मधुकर निकम हे धडे देणार आहेत.
तसेच 7 ते 8 यावेळेत विविध तज्ञांचे आरोग्यविषयी मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये हृदयरोगाबाबत डॉ. अनिकेत कटारिया, आहार व पंचभौतिक उपचार यावर डॉ.हेमा सेलोत, कॅन्सर प्रतिबंधक उपाय यावर डॉ.सतीश सोनवणे, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली यावर डॉ.सुधा कांकरिया आदि मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या आरोग्यदायी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभय कटारिया यांनी केले. शेवटी रघुनाथ केदार यांनी आभार मानले.