अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवी, साहित्यिक तथा अध्यापक सुदर्शन चंद्रशेखर धस यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मराठी विषयातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल रयत संकुल अहमदनगर व रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
धस यांचा उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, बापूसाहेब ओव्हळ, रयतचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, अशोक बाबर, माजी लेखापरीक्षक विश्वासराव काळे, उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, राजनारायण पांडूळे, मुख्याध्यापक अनुसंगम शिंदे आदी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेने सर्वसामान्य बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे उघडी करुन दिली आहेत. सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळण्यासाठी मार्गदर्शक शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे . पुणे विद्यापिठाची पीएच.डी. मिळणे अत्यंत अवघड गोष्ट असून, रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील शिक्षकांने ही सर्वोच्च पदवी मिळवणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दादाभाऊ कळमकर यांनी धस यांचे पीएचडी मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. धस हे रयत शिक्षण संस्थेमध्ये, न्यू इंग्लिश स्कूल हंगे या ठिकाणी अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागील 25 वर्षापासून ते सातत्याने कथा, कविता व लेख विविध वृत्तपत्रे, मासिके व दिवाळी अंक यांमधून लिहित आहेत. त्यांचा भावशलाका हा काव्यसंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेला आहे. शैक्षणिक व साहित्य लेखनाचे विविध सन्मान पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळालेले आहेत.