राजकारणाने निर्माण झालेली ताबेमारी आणि सत्तापेंढारी घराणेशाही मुक्तीची हाक
लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार
लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र ताबेमारी मुक्त आणि सत्तापेंढारी घराणेशाहीमुक्त करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याची व ताबेमारी मुक्त आणि सत्तापेंढारी मुक्त महाराष्ट्र घडविण्याची हाक देण्यात आली असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
गेल्या 30 ते 35 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय पाठिंब्यातून ताबेमारी वाढली आहे. आमदारकी खासदारकीसह सर्व सरपंच होण्यापर्यंत निवडणुकांमध्ये मोठा पैसा गुंतवणाऱ्या सत्ता पेंढाऱ्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. जो सत्तापेंढारी राजकीय पक्षाला तिकिटासाठी कोट्यावधी रुपये देतो, त्यालाच तिकिटाची खात्री मिळते. मतकोंबाड संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. हजार रुपयात लोक मत देण्यासाठी तयार होतात. अशा वेळेस सत्तापेंढारी या निवडणुकांमध्ये कोट्यावधी रुपये गुंतवितात आणि मतांची सर्रास खरेदी करून मागच्या दाराने सत्ता मिळवतात. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरसुद्धा सामान्य माणसांना स्वातंत्र्याची फळे मिळालेली नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शोषण करणाऱ्या इंग्रजांना देशाबाहेर हाकलल्यानंतर या देशांमध्ये लोकांनी चांगला पर्याय दिला नाही. त्यामुळे सत्तापेंढाऱ्यांनी सर्वत्र पाय पसरले आणि त्यातून सत्तापेंढारी यांची घराणेशाही निर्माण झाली आहे. सत्तापेंढारी यांच्याकडे उत्पन्नाचे काही एक साधन नसताना, फक्त ताबामारीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची माया त्यांनी तयार करुन मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. हे साम्राज्य सांभाळण्यासाठी शेकडो गुंड पोसण्याचे काम त्यांनी सुरु ठेवले आहे. यामुळे देशातील लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी आपला डीच्चू कावा अशा ताबेमार आणि सत्तापेंढारी असलेल्या लोकांविरुद्ध वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक सत्तापेंढारी यांच्या घराणेशाहीला मतदारांनी सुरुंग लावला. त्याच प्रकारे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी संघटित होऊन ताबेमारी संपवावी आणि त्याचबरोबर सत्तापेंढारी विरुद्ध डिच्चू कावा करण्याचे म्हंटले आहे.
ज्या सत्ता पेढाऱ्यांना लोक निवडून देतात ते पुढील पाच वर्षे मतदारांना जबाबदार राहत नाहीत. यातून खड्ड्यांचे रस्ते, विकास योजनांचा बट्ट्याबोळ, गुन्हेगारांचा सुळसुळाट, जात मार्तंडांची मोठी मजल निर्माण होते. याची प्रचिती महाराष्ट्रला आली आहे. त्यामुळे लोकभज्ञाक चळवळीने या कामी संघटित विरोध केला आहे. यासाठी ॲड. कारभारी गवळी, संजय बारस्कर, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.