खासदार निलेश लंके यांचा सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार
राजकारणापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाला – पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदारपदी निवडून आल्याबद्दल निलेश लंके यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी खासदार लंके यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी प्रविण वारुळे, किरण पुंड, भाऊसाहेब ठाणगे, साहेबराव बोडखे, शिवा पाटील होळकर आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. सर्वसामान्यांच्या मनातील खासदार निवडून आल्याने सर्वत्र आनंद आहे. आमदार असताना त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लाऊन सर्वसामान्यांची प्रश्ने सोडवली. राजकारणापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाला आहे. खासदार झाल्याने ते निश्चित विविध प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या नगर दक्षिणचा कायापालट करुन विकास पर्वाची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.