राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराला मोडीत काढण्यासाठी मै हू लोकभज्ञाक मोहीम जारी
मतदानासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वाटपाची असलेली भिती खरी ठरल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वाटपाची असलेली भिती खरी ठरली आहे. मतदान केंद्रापासून अवघ्या 40 फुटांच्या अंतरावरून 500 ते 1000 रूपये भावाने मतांची खरेदी झाली असल्याचा दावा लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे. राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराला मोडीत काढण्यासाठी या चळवळीने मै हू लोकभज्ञाक अशी घोषणा करून नागरीकांना व्यापक स्वरूपात सहभागी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू ठेवले आहे.
सत्तापेंढारांच्या मोठ्या टोळ्या मतदानकेंद्राबाहेर ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याचे व्हिडीओ शुटींग करणे अवघड झाले होते. पुन्हा सत्तेसाठी पैश्यांचा महापूर निर्माण करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी देशातील भ्रष्टाचार उखडून टाकू असे स्पष्ट केले होते, परंतू अजित पवार यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार करूनही पंतप्रधानांंनी त्यांना दत्तक घेतले. ही बाब देशातील तमाम जनतेने पाहिली आहे. तेच अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांना कंड जिरविण्याची धमकी दिली. मात्र पोलीसांनी किंवा निवडणूक आयोगाने काही ऐक दखल घेतली नाही. सत्ताधारी पोलीसांना लाचार करून गप्प बसवित आहे. एकंदरीत साम, दाम, दंड, भेद, निती विखेंनी वापरली आणि त्यातून स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर लोकशाहीचे जाहिररित्या वस्त्रहरण झाले असून, मोदींचे राज्य हे कौरवांचे राज्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अप्पलपोट्या सत्तापेंढाऱ्यांनी मागच्या दाराने सत्ता मिळवण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला. त्यातून यापुढे पर्याय देण्यासाठी कोणीही उमेदवार पुढे येणार नाही आणि पिढ्यानपिढ्या चाललेली घराणेशाही आणि सरंजामशाही यापुढे देखील पोसली जाईल आणि देशात वेड्याबाभळीचे राज्य अधिक विस्तराला मदत मिळाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापुढे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे देशभरातील लोकांनी स्वातंत्र्याचा दिवा विझणार नाही, यासाठी देशवासीयांनी भ्रष्ट व जुमेबाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुध्द लढा उभा केला पाहिजे. लोकभज्ञाक तत्वप्रणालीचे बीज रोवणाऱ्या महात्मा गांधीजींचा खून ज्यांनी केला, त्यांनी धर्म व भ्रष्टाचार या दोन तंत्रांचा वापर सर्रास चालू ठेवला आहे. सध्या लोकशाहीचे देखील वस्त्रहरण जाहिररित्या सुरु असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, ॲड. बाळासाहेब पवार, यमनाजी म्हस्के, ओम कदम, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे, वीर बहादूर प्रजापती आदी प्रयत्नशील आहेत.