अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका श्रद्धा सुनील नागरगोजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नागरगोजे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माध्यमिक शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, ज्ञानदेव पांडुळे, विठ्ठलप्रसाद तिवारी, संजय सपकाळ, नंदकुमार हंबर्डे, सुरज घाटविसावे आदी उपस्थित होते.
श्रद्धा नागरगोजे या सांगळे गल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिर शाळेच्या मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2000 ते 2017 या कालावधीत राज्यात 30 विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये आलेले आहेत. तसेच योग विद्या धाम येथील उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षिका व उत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मातृ स्वरूप-श्रेय स्वरूप या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुरस्कारासाठी त्यांनी सातत्याने दहा वर्षे काम केले आहे. स्वानंद बालसंस्कार केंद्रावर त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत समर्थ सावेडी विद्यालयाने सलग पाचव्यांदा विजेतेपद मिळवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नागरगोजे या तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी येथील प्रा. सुनील नागरगोजे यांच्या पत्नी असून, मार्कंडेय विद्यालय येथील सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक गणपतराव सानप यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. इंग्रजी व क्रीडा विषयाचे शिक्षक घनश्याम सानप यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. या यशाबद्दल त्यांचे प्रसाद सामलेटी, वत्सला सानप, अमोल काजळे, अॅड. विकास ढोकळे आदींनी अभिनंदन केले आहे.