राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडो मारो
बाबासाहेबांचा पोस्टर फाडल्याचा निषेध
महापुरुषांचा अवमान करणारे आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी- प्रा.माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आले. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रा. माणिक विधाते, मयूर बांगरे, अंकुश मोहिते, साधनाताई बोरुडे, सारंग पंधाडे, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे, मोना विधाते, सुभाष वाघमारे, राहुल नरोडे, सुनिता भाकरे, रेणुका पुंड, सतीश शिरसाट, सुहास पाटोळे, बाळा भांबळ, सुरेश वैरागर, प्रमोद आठवले, येसुदास वाघमारे, सचिन पवार, विशाल अण्णा बेलपवार, बाजीराव भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे दोन श्लोक घेतल्याचा निषेधार्थ जितेंद्र आव्हाड महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. या कृतीमुळे त्यांच्यावर राज्यभरात तीव्र भावना व्यक्त होत असताना नगर शहरातही त्याचे पडसाद पहावयास मिळाले. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जोरदार निदर्शने करुन आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारले व कोतवाली पोलीस ठाणे येथे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील नौटंकीकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून नव्या वादाला सुरुवात केली आहे. त्यांच्या कृतीतून बाबासाहेबांबद्दल त्यांची किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून येते. त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला असून, आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन आव्हाड यांनी तात्काळ आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तर वारंवार महापुरुषांचा अवमान करणारे आव्हाड यांना शहरात फिरकू देणार नसल्याचे सांगितले.