राहुल गांधींचा आवाज हा देशातल्या १४० कोटी जनतेचा आवाज आहे – किरण काळे
अहमदनगर प्रतिनिधी : गुजरात न्यायालयाने मार्च महिन्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गांधी यांची खासदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती. याला गांधी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने यावरील सुनावणीच्या वेळी या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे गांधी यांचा खासदारकीचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. ही बातमी समजताच अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांनी शहरात एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. राहुल गांधींचा आवाज हा देशातल्या १४० कोटी जनतेचा आवाज असून तो षड्यंत्र करून कोणाला दाबता येणार नाही, असे प्रतिपादन यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले.
यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, काँग्रेसच्या औद्योगिक व व्यापार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती, काँग्रेस केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे, ज्येष्ठ नेते सुनील क्षेत्रे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, कामगार आघाडीचे सुनील भिंगारदिवे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर राजेंद्र तरटे दीपक काकडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की, देश मुठभर उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम देशातल्या सरकारने केले आहे. राज्यात देखील गद्दारांना बरोबर घेत महाराष्ट्रातील सरकार राज्याला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सातत्याने करत आहे. कर्नाटक निवडणुकीतील विजयामुळे संबंध देशामध्ये काँग्रेसच्या पुढाकारातून उभी राहिलेली इंडिया आघाडी ही मोदी सरकारला कडवे आव्हान उभे करत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा करोडो देशवासीयांच्या वतीने उठणारा संसदेतील राहुल गांधींचा आवाज पुन्हा देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये देश हितासाठी घुमणार आहे.
काळेंना पोलीसांच्या नोटिसा :
ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा माहिती देताना म्हणाले की, शहरातील हत्याकांडांवर निर्भीडपणे भाष्य करणाऱ्या, शहरातील गुन्हेगारी, दहशतच्या विरोधात नगरकरांच्या वतीने काँग्रेसच्या माध्यमातून राजाश्रयीत गुन्हेगारीवर हल्लाबोल करणाऱ्या किरण काळे यांचा आवाज दडपण्याकरिता तोफखाना पोलिसांनी राजकीय दबावातून त्यांना सीआरपीसी १४९ व ९१अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. याबाबत कोणते ही वक्तव्य करू नये, असे म्हटले आहे. ही भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारातील कलम १९ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी बाब आहे. शेवटी देशाचे संविधान हे सर्वोच्च असून अशा दबावतंत्राला काळे बळी न पडता नगरकरांचा आवाज घटनेच्या चौकटीत राहून उठवत राहतील असे शहर काँग्रेसचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या दोन्ही नोटिसांना काळे यांनी लेखी उत्तर दिले असून त्याच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर विभागाचे डीवायएसपी यांना देखील देण्यात आल्या असून यामध्ये अनेक मुद्द्यांवरती बोट ठेवत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली असल्या.ची माहिती मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी दिली आहे.
- Advertisement -