रेल्वे क्रॉसिंगवर युवकाचा जीव गेल्याने ग्रामस्थांनी बंद पाडले त्या कंपनीचे काम
भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त
कंपनीने ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये – प्रा. दीपक जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी) – देहरे (ता. नगर) येथे रेल्वे क्रॉसिंगवर एका युवकाला जीव गमवावा लागला असताना, वारंवार भुयारी मार्गासाठी पाठपुरावा करुन देखील दुर्लक्ष करणाऱ्या एम.एस. मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम सोमवारी (दि.3 जून) ग्रामस्थांनी बंद पाडले. तर तातडीने भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देहरे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
देहरे येथील भुयारी मार्गाचा प्रश्न अनेक वर्षापासून गाजत असताना रविवारी (दि.2 जून) प्रदीप रामदास पटारे या युवकाचा रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना रेल्वेखाली सापडून दुर्देवी मृत्यू झाला. या मृत्यूस कंपनीला जबाबदार धरुण ग्रामस्थांनी एम.एस. मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्लांट बंद पाडला. कंपनीने रस्त्याचे काम करताना देहरे येथे प्लांट करण्यासाठी ना हरकत दाखला घेताना भुयारी मार्गाचे काम आधी करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु ते काम अद्यापि सुरू केलेले नाही. दरम्यानच्या काळात डिसेंबर मध्ये उपसरपंच प्राध्यापक दीपक नाना जाधव यांनी भुयारी मार्गाचे काम सुरू करावे म्हणून आमरण उपोषण केले होते. तेव्हा काम महिन्याभरात सुरू करतो, असे आश्वासन कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले. कंपनीने काम सुरू केले, परंतु ते फक्त दाखविण्यासाठी एक महिन्यात पूर्ण होणारे काम चार महिने झाले तरी पूर्ण झालेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नुकतेच रेल्वे लाईन क्रॉस करताना युवकाला आपला जीव गमवावा लागला असून, अजून असे किती जिवांचे बळी कंपनी घेणार? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहे. तर कंपनीने तातडीने भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आंदोलनात उपसरपंच प्रा. दीपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश लांडगे, किरण लांडगे, अजित काळे, माजी सरपंच भानुदास भगत, सुनील बालवे, महेश काळे, नितीन भांबळ, रमेश काळे, अनिल चोर, रावसाहेब चोर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी झाले होते.
15 जून पासून शाळा सुरू होणार आहेत. पूर्वी एकच रेल्वे ट्रॅक होता. आता दुसराही ट्रॅक सुरू झाल्याने गाडी कुठून व कोणत्या ट्रेक वरून येत आहे हे लक्षात येत नाही. या रेल्वे लाईन मुळे गावाचे पूर्व-पश्चिम असे दोन भाग झाले असून, शाळा, दवाखाना, बँक, बाजार, डेरी अशा कितीतरी गोष्टींसाठी ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांना रेल्वे लाईन आपला जीव मुठीत धरून ओलांडावी लागते. तेव्हा लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करावे, संबंधित कंपनीने ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये. -प्रा. दीपक जाधव (उपसरपंच, देहरे)