लक्ष्मण घोलप यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर
ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ भावनेने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लक्ष्मण मारुती घोलप यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते घोलप यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे आयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सचिव मंदाताई डोंगरे यांनी दिली.
पिंपळवाडी (ता. जामखेड) येथील लक्ष्मण घोलप मागील 35 ते 40 वर्षापासून सामाजिक कार्यात योगदान देत आहे. शेतकरी, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. तर ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्थांना आधार देण्याचे काम केले. तर जिल्हा परिषद शाळेला विविध साहित्याची मदत देऊन, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविले. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.