लांबच्या शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलची भेट
हुशार व गरजू विद्यार्थ्यांना बाबासाहेब बोडखे यांचा मदतीचा हात
अहमदनगर (प्रतिनिधी) – लांबच्या शाळेत पायी जाणाऱ्या हुशार व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांच्या वतीने सायकलचे वाटप करण्यात आले. बोडखे परिवाराच्या वतीने दरवर्षी सातत्याने गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. नुकतेच शाळा सुरु झाली असून, मुला-मुलींना लांबच्या शाळेत पायी जावे लागत असल्याने बोडखे यांनी विद्यार्थ्यांना सायकलची व्यवस्था करुन दिली.
केशवराव गाडीलकर विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, विराज बाबासाहेब बोडखे आदी उपस्थित होते.
महेंद्र हिंगे म्हणाले की, गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता बाबासाहेब बोडखे सातत्याने विविध उपक्रमातून आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांपासून ते गरजू विद्यार्थ्यांना ते वर्षभर शैक्षणिक मदत देत असतात. अनेक विद्यार्थी त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले असून, गरजू विद्यार्थ्यांना ते विविध प्रकारची मदत करत आहे. बिकट परिस्थितीतून आलेले बोडखे यांचे शिक्षण क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य आहे. त्यांचे भवितव्य उज्वल घडल्यास देश सक्षम होणार आहे. यासाठी प्रत्येकाने गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी हातभार लावण्याची गरज आहे. बिकट परिस्थितीतून शिक्षण घेताना आपल्यावर आलेली वेळ या विद्यार्थ्यांवर येऊ नये, या भावनेतून त्यांना सातत्याने मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.