लोकसभा निवडणुकी संदर्भात बुधवारी शहर काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन
प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निलेश लंके यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मंगळवारी सकाळी मोहटा देवी येथून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. पाटील यांची भेट घेत शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांनी कार्यकर्त्यांसह पाथर्डी शहरात स्वागत केले. मात्र शहरातील काँग्रेस कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले नाही.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी सात वाजता अहमदनगर शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सक्रिय झाले आहेत. ते शहराच्या विविध भागांमध्ये भेटीगाठी देताना पहायला मिळत आहेत. शहर उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते लंके यांच्या समवेत सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. मात्र अजून शहरातील काँग्रेस प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून आलेले नाही. काँग्रेसचा गोटात शांतता पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहर काँग्रेसच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहिती देताना मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे म्हणाले की, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये काँग्रेस भक्कमपणे काम करते आहे. शहरातील दहशत आणि शहराचा विकास या मुद्द्यां वरती निर्भीडपणे जनहितासाठी काँग्रेस आवाज उठवत आहे. लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची आहे. संविधान धोक्यात आले आहे. अशा वेळी हुकूमशाहीचा पराभव करणे गरजेचे आहे. बैठकीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले जाणार असून त्यानंतर पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.