लोणीच्या पाहुण्याला घरी पाठवा ! प्रभावती घोगरे यांचे आवाहन
पोखरी येथील सभेस मोठा प्रतिसाद
पारनेर : प्रतिनिधी
मतदारांनो जागृत व्हा, पाहुणे-रावळे सांभाळायचे बंद करा. लोणीच्या पाहुण्याला त्याच्या घरी पाठवून देण्याची वेळ आली असल्याचे सांगतानाच लोणीच्या साम्राज्याविरोधात लढणाऱ्या नीलेश लंके यांना विजयी करण्याचे आवाहन कृषीभुषण प्रभावती घोगरे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील पोखरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये घोगरे या बोलत होत्या. यावेळी पोखरी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी बोलताना घोगरे म्हणाल्या, अगोदर तुम्ही राज्य व्यवस्थात चालवा, देशाची चिंता कशाला करता ? घरातच खायला नाही, बाकीच्या लोकांना मात्र काहीच्या काही आश्वासने दिली जातात. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास मोल कसे मिळेल ? तो स्वयंपुर्ण कसा होईल ? याकडे दुर्लक्ष केले जाते. आज शेतकऱ्यावर जी वाईट वेळ आहे ती कोणावरही नाही. वीज, पाणी, रस्ते या तीन मुलभूत गरजा शेतक-याच्या आहेत.आठ तास वीज मीळते ति देखील रात्रीची. डीपी जळाल्यावर दोन दोन दिवस वीज नसते. यावर उपाय शोधले पाहिजेत. त्यासाठीच आम्ही तुम्हाला निवडूण दिले आहे. आबकी बार चारसो पार, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नाही असे घोगरे यांनी ठणकाउन सांगितले.
यावेळी गंगाराम बेलकर, बापूसाहेब शिर्के, अॅड. राहुल झावरे, अशोक घुले, गोरख आहेर, राजेंद्र चौधरी, प्रकाश गाजरे, बाळू शिंदे, योगेश पवार, रवी गायके, पप्पू गुंड, पोपट गुंड, अजित भाईक, सुवर्णा आहेर, सुरेखा डोंगरे, अभिजित झावरे, अमोल उगले यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
▪️चौकट
हुकूमशाही, दडपशाही संपवा
नीलेश लंके शेतकरी कुटूंबातील माणूस एवढया हिमतीने मोठया शक्तीविरूध्द लढा देत आहेत. पारनेरकरांनी त्यांना हिंमत देण्याचे, पाठीशी खंबीर उभे राहण्याचे काम केले पाहिजे. पारनेर तालुक्याला सुवर्णसंधी मिळाली असून नीलेश लंके यांना दिल्लीला पाठवून ही हुकुमशाही, दडपशाही संपविण्याचे आवाहन घोगरे यांनी केले.
▪️चौकट
पाहुणा किती दिवस राहू शकतो ?
त्यांचे वास्तव्य शिर्डी मतदारसंघामध्येच असते. तुमचा उपयोग फक्त मतांपुरता केला जाणार आहे. निवडणूकीपुरते तुमच्याकडे येणे राहिल. तुम्हाला विचारले जाईल. त्यानंतर ज्याच्या त्याच्या घरी तो जाईल. पाहुणा किती दिवस राहू शकतो ? दोन दिवस, चार दिवस. त्याला आपल्या घराची ओढ असते. असे सांगत घोगरे यांनी पाहुण्याला घरी पाठविण्याचे आवाहन केले.
▪️चौकट
विखे यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ?
नीलेश लंके मोठया साम्राज्याविरोधात लढा देत आहेत. शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे धुरंधर नेते आपल्या पाठीशी उभे आहेत. शरद पवारांवर टीका केली म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मोठे होत नाहीत. शरद पवारांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले. राहुरी कृषी विद्यापीठात संकरीत गाईंसाठी मोठे युनिट उभे केले. मांजरी येथे ऊस संशोधन केंद्र सुरू केले आहे. एमआयटी पार्क उभे केले. विखे यांनी सहकारी संस्था सोडून शेतकऱ्यांसाठी काही केले का असा सवाल घोगरे यांनी केला.
▪️चौकट
मत कोणाला ते आम्हाला कळते !
राहता तालुक्यातील शिक्षण संस्था, साखर कारखान्याचे कामगार नगर दक्षिण मतदारसंघात आले आहेत. तुमच्याकडे हे लोक येऊन सांगू लागले की विखे यांना मत द्या तर तुम्ही सांगाल की चहा प्या. बस नसेल तर मुक्काम करा. मत कोणाला द्यायचे ते आमचे आम्हाला कळते. यांचे कामगार तुम्हाला येऊन सांगणार. मीडीयाच्या माध्यमातून वास्तव काय आहे हे आपल्याला समजते. त्यांच्या या यंत्रणेचा काही उपयोग होणार नसल्याचे घोगरे म्हणाल्या.
▪️चौकट
लादलेला उमेदवार का स्विकारायचा ?
आम्ही इतर ठिकाणच्या व्यक्तीला का मत द्यायचे ? आमच्याकडे काही पात्रता नाही का ? आमच्याकडे काही ताकद नाही का ? लादलेला उमेदवार तुम्ही का स्विकारायचा ? आपल्या घरात बाहेरचा कुणी कारभारी चालतो का ? पाच दिवसाऐवजी दहा दिवस पाहुणा राहिला तर तुम्हाला चालतो का ? बायकोचा भाउ असला तरी कुरकुर सुरू होते. मग पाहुणा का ठेऊन घ्यायचा ? असे प्रश्न घोगरे यांनी उपस्थित केले.
▪️चौकट
सामान्यांच्या चरितार्थाशी त्यांना देणे घेणे नाही
विखे हे प्रवरा कारखाना चालवितात, राहुरी कारखाना ते सुस्थितीत आणतील अशी आशा होती मात्र सामान्य जनतेच्या चरितार्थाशी त्यांना काही देणे घेणे नाही. विरोधकास जेरीस आणून त्यास कसे संपवायचे व सत्ता आपल्या ताब्यात कशी ठेवायची ऐव्हडेच यांचे ध्येय आहे असे घोगरे म्हणाल्या.