जामखेड प्रतिनिधी –
वंजारवाडी येथील नागरीकांची घरफोडी झाल्यानंतर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मोबाईलवर फोन झाल्यावर गावातील तरूणांनी चोरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता चोर व जमावामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर त्यांनी ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्यावर व प्रतिष्ठित व्यक्तीवर ३०७ सारखा खोटा गुन्हा दाखल केला तो चार दिवसात मागे घेण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा वंजारवाडी ग्रामस्थांनी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार दि. ६ आँगस्ट रोजी मधुकर दत्तू जायभाय, शिवाजी बाबासाहेब जायभाय, आशाबाई व हनुमंत जायभाय यांचे घराचे कुलूप कडी तोडून कपाटातील डब्यातील पैसे व दागिने दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान चोरी झाली याची माहिती समजल्यानंतर व ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या नंबर वरती फोन आल्यावर गावातील व बाहेरगावातील तरूणांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर चोरांनी उलटसुलट भाषा करून विचारपूस करणा-यांना मारहाण केली. चोरांनीच गाडीच्या काचा फोडल्या यावेळी चोर व जमावामध्ये बाचाबाची झाली त्यावेळी अरणगाव येथील काही लोकांनी चोरांना व जमावाला बाजुला केले. चोरांनीच वंजारवाडी येथे ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्यावर व प्रतिष्ठित व्यक्तीवर ३०७ सारखा खोटा गुन्हा दाखल केला. सदर चोरांनी दाखल केलेला खोटा गुन्हा येत्या चार दिवसात मागे घेण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर संजय जायभाय, उध्दव नागवडे, कांतीलाल जायभाय, दत्ता फुंदे, मनोज जायभाय, भगवान जायभाय, रमेश ओमासे, सोमनाथ जायभाय यांच्यासह दोनशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी वंजारवाडी ग्रामस्थांनी दिलेले निवेदन स्विकारून याबाबत वरिष्ठांना माहितीस्तव पाठवण्यात येईल व त्यांच्या मार्गदर्शना नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
यावेळी शेवराव जायभाय व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .