तांबोळी कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
तपासी अधिकाऱ्यांकडून तपास काढून स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेकडे (एलसीबी) कडे तपास वर्ग करण्याची मागणी.
अहमदनगर (प्रतिनिधी) – वाळकी (ता. नगर) येथे जावेद तांबोळी याला मारहाण करून मारून टाकले असल्याने सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व पुरावे असून देखील खुनातील आरोपींना तपासातील हलगर्जीपणामुळे अटकपूर्व जामीन मिळालेला असून तपासातील भूमिका संशयास्पद असल्यामुळे हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेकडे (एलसीबी) कडे देण्यात यावा.या मागणीसाठी तांबोळी कुटुंबीयांनी न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल संरक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले.
यावेळी मयताचे वडील गणीभाई तांबोळी, आई सजिदा तांबोळी, मयताची पत्नी मिनाज तंबोली, मुलगा सईद तांबोळी, कैफ तांबोळी,आयान तांबोळी, मुलगी सुमईया तांबोळी आदीसह कुटुंब उपस्थित होतं.
फरार आरोपी हे तांबोळी कुटुंबीयांना धमकावत असून, पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करुन कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वाळकी (ता. नगर) येथे १७ ऑक्टोंबर रोजी किरकोळ वादातून जावेद गणीभाई तांबोळी या युवकाचा खून करण्यात आला.शेजारी राहणारे बादल सलीम शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी पाईप व दगडाने मारुन खून केल्याची फिर्याद मयताची पत्नी मिनाज तांबोळी जावेद हिने दिली आहे.
यामध्ये भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये एकूण अकरा आरोपी आहेत सदर घटना गावातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये पूर्णपणे दिसून येत आहे.
हे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे व जावेदला मारहाण करणारे आरोपी स्पष्ट दिसत आहे असे असताना केवळ तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांना चौकशी अधिकारी हे सहकार्य करत आहेत.
पोलीस प्रशासन त्याला अटक करण्यास विलंब करत आहेत. तसेच इतर आरोपींनाही पाठीशी घातले जात आहे.सदर तपासाबाबत विचारणा केली असता, पोलीस उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप तांबोळी कुटुंबीयांनी केला आहे.
या खून प्रकरणातील आरोपी फरार असल्याने कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मयताची पत्नी मिनाज तांबोळी जावेद हिला घरी येऊन आरोपी दमदाटी करत आहेत. हा प्रकार दररोज सुरु आहे.
१९ ऑक्टोंबर रोजी मयताच्या अल्पवयीन मुलास अंजुम शेख, उस्मान शेख व शमशाद शेख यांनी ग्रामपंचायत कार्यालयामागे मारहाण केली. या प्रकरणी शब्बीर तांबोळी यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यामधील आरोपींना देखील अद्यापि अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणातील तपास अधिकारी आरोपींना पाठिशी घालण्याचे काम करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर प्रकरणी तपास अधिकार्यांकडून तपास काढून, हा तपास सक्षम अधिकाऱ्याकडे तपास वर्ग करावा व खुनातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी तांबोळी कुटुंबीयांनी केली आहे.