नेवासा (प्रतिनिधी) – वीज चोरीसाठी टाकलेले आकडे काढल्याच्या रागातून गोणेगाव (ता.नेवासा) येथील एकाने वीज कर्मचाऱ्यास अर्वाच्य शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केल्याप्रकरणी नेवासा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
शासन एकीकडे वीज चोरी रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असून वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी चोरीला पायबंद घालण्यास सूचना नेहमी करत असतात. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरचे कार्यकारी अभियंता काकडे यांच्या आदेशानुसार व नेवासा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री शरद चेचर यांच्या आदेशानुसार श्री शेजुळे यांच्या पथकाने वीज चोरी विरोधात धडक मोहीम उघडली आहे.
कर्मचारी सयाजी गोडसे, शिवकुमार आचारी, बागुल, सचिन डाके, मोसिन साळवे, नितीन जाधव, संदीप कसबे,अभिजीत भाकरे, नेवासा ग्रामीण कक्षा एक येथे कार्यरत असलेले असिस्टंट लाईनमन हरिभाऊ येळे यांच्यासह तालुक्यातील गोणेगाव येथे वीज चोरीचा बंदोबस्त करण्यासह थकबाकी वसुलीसाठी गेले असता एके ठिकाणी बेकायदेशीरपणे वीज वाहक तारांवर आकडे टाकून वीज वापर केला जात असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी लाईनमन येळे यांनी खांबावर चढून आकडे काढत वायर जप्त केल्याचे पाहून अंबादास रोडे नामक व्यक्तीने त्यांना आकडे का काढले असा जाब विचारत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, धक्का बुक्की करत मारहाण केली.
याप्रकरणी महावितरणच्या नेवासा उपविभागाचे कार्यकारी अभियंता शरद चेचर तसेच आकाश शेजुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नेवासा उपविभागातील वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे.
महावितरणचे कर्मचारी असुरक्षित –
कर्मचारी वीज चोरी पकडण्यासाठी गेले असता संबंधित वीज चोर तसेच विज बिल थकबाकीदार कनेक्शन कट केल्याच्या रागातून कर्मचाऱ्यावर हल्ले करत असून मारहाण करत असल्याचे प्रकार नेवासामध्ये वाढत चालले आहेत. यामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली असून त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.