शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने अभिवादन
महात्मा फुले यांच्या तजोमय विचाराने सत्यधर्माची पहाट उगवली – अॅड.अभय आगरकर
नगर – महात्मा फुले यांनी अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या आणि अठरा विश्वे दारिद्रय उराशी असणार्या चक्रव्ह्युहात सापडलेल्या समाजाचा उद्धार केला. हजारो वर्ष बहुजन समाज गुलामगिरीच्या गर्तेत बुडालेला होता. जात-पात भेद मोठ्या प्रमाणावर वाढले होते, भारतीय समाज तेजोहीन झालेला होता. सर्वत्र सामाजिक गुलामगिरीचा अंधकार दाटलेल्या, गुलामीची जाणीव कोणालाच होत नव्हती, समाज अनिष्ट रूढी परंपरेत बुडालेला होता. अशावेळी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या रुपाने समाजाला एक आशेचा किरण दिसला. आणि त्यांच्या तजोमय विचाराने सार्वजनिक सत्यधर्माची पहाट उगवली. समाज परिवर्तनाची नांदी घेऊन खितपत पडलेल्या समाजाला उत्सर्जित अवस्था प्राप्त करुन देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरच्यावतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महंत संगमनाथ महाराज, देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, ज्ञानेश्वर रासकर, विजय कोथिंबीरे, गजानन ससाणे, प्रा.माणिकराव विधाते, नितीन पुंड, राजेंद्र एकाडे, गणेश राऊत, नामदे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पंडितराव खरपुडे म्हणाले, शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणार्या जोतिबा फुले यांना जनतेने ‘महात्मा’ पदवी बहाल केली. त्यांचे विचार आणि कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे सांगितले.