रस्त्याच्या खड्ड्यात प्रतिकात्मक आयुक्तांची खुर्ची ठेवून केला शहर सौंदर्यकारणाचा जाहीर निषेध
नगर – नगर शहरातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा प्रभाग क्रमांक 15 या भागातील आगरकर मळा या रस्त्यावर जवळपास 50 फुटांचा खड्डा दोन वर्षापासून पडलेला आहे. असेच खड्डे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पडलेले आहे. तसेच शहरातील विविध भागात कचर्याचे ढीगही दिसून येतात, तरीही नगर शहर सौंदर्यकरण व स्वच्छता पुरस्कार देणार्यांवर गुन्हे दाखल करावी, अशी मागणी करुन मनसेचे सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात आयुक्तांची प्रतिकात्मक खुर्ची ठेवून मनसेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी हेमंत थोरात, गणेश शिंदे संतोष मेहेर, मिनीनाथ होले, परेश पित्रोडा आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी नितीन भुतारे म्हणाले, प्रभाग क्रमांक मधील आगरकर मळा परिसरात गेल्या दोन वर्षांपासून मोठा खड्डा पडलेला असून, त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती जर आज पाहिली तर एकदम डोंगर भागातल्या रस्त्यांपेक्षा सुद्धा बिकट आहे. या भागामध्ये सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक असून देखील सुद्धा महापौरांचा या भागाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याच भागात माजी नगराध्यक्ष माजी महापौर, माजी उपमहापौर, आजी-माजी काही तालुक्यातील आमदार, माजी सभापती सर्व प्रतिष्ठित लोकांचा भाग हा समजला जातो. अशाच भागात जर नगर शहराची अशी दयनीय चिखलाची गाळाच्या साम्रज़्यासारखी परिस्थिती असेल तर नगर शहराची परिस्थिती कशी असेल यावरून लक्षात येते. त्यामुळे आम्ही आयुक्तांची खुर्ची 50 फूट लांब खाड्यामध्ये ठेवून त्यांचा जाहीर निषेध केला. तसेच शहर सौंदर्यकरण व स्वच्छता पुरस्कार मिळालेले अहमदनगर महानगरपालिकेला ज्या कोणी अधिकार्यांनी महानगरपालिका ‘ड’ वर्ग क्रमांक तिसरा पुरस्कार दिला, अशा अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली.
पुढे बोलतांना नितीन भुतारे म्हणाले की, अशा परिस्थितीत जर महानगरपालिकेला पुरस्कार मिळत असेल तर हा पुरस्कार नक्कीच कुठेतरी पैसे देऊन किंवा सत्तेचा फायदा गैरवापर करून हा पुरस्कार मिळालेला दिसतो. त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा. ज्या प्रकारे महापौर व आयुक्त हे पुरस्कार घेण्यासाठी मोठ्या उत्साहात घाईगडबडीने शासनाकडे गेले, त्याच पद्धतीने शासनाकडे मागणी करून त्यांनी हा रस्त्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा मनसेच्या वतीने आज आयुक्तांची प्रतिकात्मक खुर्ची खड्यात ठेवली आहे, उद्या हीच खुर्ची चिखलाबरोबर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात आणण्यात येईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.