केडगावमध्ये रंगली मुलींची बास्केटबॉल स्पर्धा
एबीसी वाडियापार्क संघ व एसबीसी सावेडी संघ विजयी.
शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुलींनी एकतरी मैदानी खेळ खेळावा -वैशाली कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- विक्रम लोखंडे
केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे केडगाव देवी मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात एबीसी वाडियापार्क संघ व 17 वर्षा खालील गटात एसबीसी सावेडी संघाने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत शहरातील व उपनगरातील 12 मुलींचे संघ सहभागी झाले होते.
उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. वैशालीताई कोतकर, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे छबुराव कोतकर, जालिंदर कोतकर, मुख्याध्यपिका वासंती धुमाळ, प्रशिक्षक सत्यम देवळालीकर, ओमसिंग बायस, राष्ट्रीय खेळाडू सचिन अग्रवाल, विजय सर, भापकर, अक्षय कर्डीले, हर्षल शेलोत, प्रथमेश काशीद आदींसह खेळाडू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैशालीताई कोतकर म्हणाल्या की, मुलीचा शारीरिक विकास होण्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचा आहे. शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुलींनी एकतरी मैदानी खेळ खेळावा. खेळातून पुढे आलेल्या खेळाडूंना शासनाकडून नोकरीमध्ये देखील प्राधान्य दिले जात आहे. प्रथमच केडगावमध्ये झालेल्या मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेमुळे खेळाला चालना मिळणार आहे.
मुलींमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी घेण्यात आलेली स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. मनोज कोतकर यांनी मुलांना शिक्षणाबरोबर खेळही आयुष्यात महत्त्वाचा आहे. खेळाने मुलांमध्ये खेळाडूवृत्ती वृध्दींगत होत असते. यामुळे मुलांना यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होत असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत एसबीसी सावेडी, एबीसी वाडिया पार्क, बॉलर्स सारडा विदयालय, ओयासिस इंग्लिश मिडीयम स्कूल, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय, केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी आदी संघाचा समावेश होता. स्पर्धेचे पंच म्हणून व्हिक्टर, नशरा, स्तवन यांनी काम पाहिले.
संदीप उद्योग समूहाच्या वतीने विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले. दोन्ही गटातून उत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रेया बायस व श्रुती सुरसे या मुलींची निवड करण्यात आली. खेळाडूंना मनोज कोतकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. दहावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल अकॅडमीची माजी खेळाडू नक्षत्रा ढोरसकर, पूर्वा ढोरसकर, ज्ञानेश्वरी पालवे, हार्दिक कोतकर व यश राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन संदीप कोतकर मित्र परिवार व स्वाती बारहाते यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद जमदाडे यांनी केले. आभार रोहिणी कोतकर यांनी मानले.