शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा “असहकार”
अहमदनगर प्रतिनिधी – ऑगष्ट मध्ये सुरु होत असलेल्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन – नियोजनास सहकार्य न करण्याचा एकमुखी निर्णय न्यू आर्टस कॉलेज, अहमदनगर येथे नगर, पारनेर व राहुरी तालुक्याच्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला.
शालेय स्पर्धा आयोजन नियोजना संदर्भात क्रीडा कार्यालयाकडून आज नगर येथे क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२२-२३ चा शालेय स्पर्धा आयोजनाचा न मिळालेला निधी, खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र न मिळणे, सिंथेटिक ट्रॅक नसल्याने खेळाडूंचे होत असलेले नुकसान, शालेय स्पर्धेत साहित्य व सुविधांची वानवा, क्रीडा अनुदान प्रकरणे न मंजुर करणे, क्रीडा अनुदान वाटपात अपहार, तुटपुंजे पंच मानधन, निधी कपात, सुविधेच्या नावाखाली आकारली जाणारी ऑनलाईन कॉन्व्हेनीयन्स फी, ऑनलाईन मधील त्रुटी, क्रीडा स्पर्धेनंतर तालुका प्रमुखांना व शिक्षकांना मिळणारी वागणूक या संदर्भात शारीरिक शिक्षक व पदाधिकारी फारच आक्रमक झाले होते. मिटींगच्या वेळी सभागृहाच्या खालीच शिक्षकांनी डेरा मांडला. वरील कारणे क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांच्या पुढे मांडताना एकही शिक्षक सभागृहात बसला नाही. शालेय क्रीडा स्पर्धा कार्यालयाने घ्याव्यात आयोजन नियोजनात कुठलेही सहकार्य शिक्षक करणार नसल्याने बैठक स्थळावरूनच परतीच्या मार्गावर शिक्षक ठाम होते. मात्र संघटना पदाधिकारी व शिक्षकांना ठोस आश्वासन मिळालेनंतरच तब्बल एक तासाने बैठक सुरू झाली.
बैठकी दरम्यान नगर तालुकाध्यक्ष महेंद्र हिंगे, राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, पारनेर अध्यक्ष बापूराव होळकर, राहुरी तालुकाध्यक्ष प्रकाश मोढे, उन्मेश शिंदे, संतोष ठाणगे, प्रताप बांडे, बबन लांडगे, नितीन घोलप, बाळासाहेब मुळे, घनःश्याम सानप आदींनी समर्थपणे बाजू मांडत शालेय स्पर्धेस ‘असहकार आंदोलनांची’ हाक दिली असता सर्वांनी एकमुखी पाठींबा दिला.
क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे व जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी वेळ मारून नेण्यासाठी केलेले समर्थन कोणत्याही शिक्षकांना भावले नाही. शिक्षक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना मैदानावर घेऊन जाणार असून स्पर्धा आयोजनात कुठलीही मदत न करता “असहकार आंदोलनावर” कायम राहत आंदोलनाचे रणसिंग फुंकले. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, क्रीडा आयुक्त, क्रीडा सचिव यांना निवेदन देणार असून या प्रश्नी लक्ष घालण्याची जोरदार मागणी झाली.
या बैठकीस शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीप काटे, बद्रीनाथ शिंदे, अभयसिंग पाटील, सुनील भुजाडी, अशोक पवार, हरीश्चंद्र ढगे, मनिषा पुंडे, नाना डोंगरे, विनायक उंडे, रमाकांत दरेकर, आदींसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
शालेय स्पर्धा संपून ९ महिने उलटले तरी क्रीडा स्पर्धा आयोजनाचे पैसे न मिळणे, खेळाडूंना तालुका प्राविण्याचे प्रमाणपत्र न मिळणे, सिंथेटिक ट्रॅक/मैदाने, आधुनिक साहित्य या सारख्या दर्जेदार क्रीडा सुविधा न मिळणे या बाबी गंभीर असून कार्यालयास विनंती करूनही हा प्रश्न मार्गी न लागल्याने नाईलाजाने “असहकार आंदोलन” करावे लागते आहे. शिक्षक पंच, आयोजक म्हणून काम करणार नाहीत . स्पर्धा या कार्यालयाने घ्यायच्या आहेत त्यामुळे खेळाडूंचे कुठेही नुकसान होणार नाही.