रविवारी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शिक्षक व पालकांमध्ये संभ्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)-
शालेय स्तरावर भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
रविवार दि. 15 ऑगस्ट या दिवशी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 30 जुलै रोजी मार्गदर्शक पत्र निर्गमित केले आहे. सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यात कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक शाळांमधून शिक्षक, मुख्याध्यापकांना स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम कसा साजरा करावा?, मुले, शिक्षक, पालक, शिक्षकेतर यांची उपस्थिती, तसेच कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित किंवा कसे ठेवावे याबाबत विचारणा होत आहे. याबाबत मार्गदर्शन करणारे पत्र तातडीने निर्गमित करण्याची मागणी शिक्षक परिषदने केली असल्याचे बोडखे यांनी सांगितले आहे.