शिर्डी प्रतिनिधी – राज्य शासनाने दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ पासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून दर्शन पासेस हे फक्त ऑनलाईन उपलब्ध असतील. त्यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी केले.
श्रीमती बानायत म्हणाल्या, जगभरात, देश व राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले असून दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य शासनाने दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२१ पासून घट स्थापनाच्या मुहुर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत.
श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनाकरीता खुले करण्यासाठी साईभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याकरीता श्री साई सभागृह येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पोलीस अधिक्षक मनोज पाटील,जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर,उप जिल्हाधिकारी संदीप निचित,प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उप विभागीय पोलीस अधिक्षक संजय सातव, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसिलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व अहमदनगर जिल्ह्यातील इतर देवस्थानचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शनपर सुचना केल्या.त्यानुसार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यात येणार असून सकाळी ०६.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत मंदिर खुले राहणार आहे. दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाणार असून हे सर्व दर्शन पासेस फक्त ऑनलाईन उपलब्ध असेल.यामध्ये १० हजार निशुल्क व ०५ हजार सशुल्क पासेस असतील.प्रत्येक तासाला ११५० साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साईभक्तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल.
तसेच प्रत्येक आरतीकरीता एकुण ७५ साईभक्तांना आरतीसाठी प्रवेश देण्यात येणार असून ४५ देणगीदार साईभक्त व २० साईभक्तांना ऑनलाईनव्दारे उपलब्ध असेल. तसेच प्रत्येक आरतीस प्रथम येणा-या शिर्डी ग्रामस्थांना १० पासेस देण्यात येतील. ग्रामस्थांना १० आरती पासेस हे साईउद्यान निवासस्थान येथुन तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील १६ गुंठे शताब्दी मंडप येथील काऊंटरवर दिले जाणार असून ग्रामस्थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व साईभक्तांनी दर्शनाकरीता जाताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे (०६ फुट अंतर ठेवुन आखणी करणेत आलेले मार्कींग प्रमाणे) पालन करावे.
मास्कचा वापर न करण्या-या साईभक्तांना तसेच १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व्यक्ती व आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्य नेण्यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्याची पालखी बंद राहील.याबरोबरच श्री साईप्रसादालय, मंदिरातील साई सत्यव्रत पुजा,अभिषेक पुजा, ध्यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.
दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर ०२ मधुन प्रवेश दिला जाणार असून व्दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे ०४ व ०५ नंबर गेटव्दारे बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच ज्या साईभक्तांना ताप असेल अशा साईभक्तांना तात्काळ उपचाराकामी कोवीड केअर हॉस्पिटलमध्ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्यात येईल. तसेच मंदिर व मंदिर परिसरात धुम्रपान करणे, थुंकणेस बंदी आहे. त्याचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे श्रीमती बानायत यांनी सांगितले.
ज्या साईभक्तांचे दर्शनाकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये. दर्शन पासेस वरील नमुद वेळे प्रमाणेच (स्लॉट नुसार) भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून नमुद वेळेचे १५ मिनीटे अगोदर प्रवेशव्दारावर उपस्थित रहावे. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.