शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही तर जिल्हा कृषी कार्यालयासमोर २२ जुलै रोजी बोंबाबोंब आंदोलन – सौ- हर्षदा काकडे
नगर:- (प्रतिनिधी २८) प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे व चुकीच्या निकषामुळे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निवारणार्थ जिल्हा कृषी कार्यालयापुढे दि-२२ जुलै २४ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन आज मा.जि. प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांचे नेतृत्वाखाली आज शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक श्री.सुधाकर बोराळे यांना दिले. यावेळी अॅड शिवाजीराव काकडे, श्री.अशोकराव ढाकणे,अकबर भाई शेख,बाळासाहेब नरके,बाजीराव लेंडाळ,नाना थोरात,बाबासाहेब म्हस्के, रमेशराव दुसंगे,राजेंद्र म्हस्के, दादा भेरे,सुमित पंचारिया, रशीद शेख,कचरू म्हस्के,हरिभाऊ ढोले,देवकाते भाऊसाहेब, बाबा पवार,गणेश मडके,सुरेश म्हस्के,बाळासाहेब काकडे,सादिक शेख,श्रीम.सरिता पूरनाळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सौ. हर्षदा काकडे म्हणाल्या की शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गावात फक्त ठराविक शेतकऱ्यांनाच विमा रक्कम मिळते.उदाहरण म्हणून कांबी गावात ६०ते ७० लोकांनाच विमा रक्कम मिळाली.इतर शेतकऱ्यांना विमा मिळावा म्हणून त्यांनी विमा भरला. कागदपत्रांची पूर्तता केली तरीही फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना विमा मिळतो याचे गौड बंगाल काय आहे.तसेच पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांकडून ५०० ते १००० रु घेण्यात आले.तसेच ज्यांनी पैसे दिले त्यांनाच पिक विमा मिळाला. सध्याच्या योजनेमध्ये पिकाचे नुकसान झाले तर ७२ तासांच्या आत तक्रार करावी लागते. पण या तरतुदीची माहिती शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे वस्तीवर दूर राहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना त्यांचे पिकाचे नुकसान होऊन देखील तक्रार करता आली नाही.वास्तविक पाहता गावात दवंडी देऊन लोकांमध्ये जागृती करणे गरजेचे होते तसे झाले नाही.
कांबी गावात १३५० शेतकऱ्यांनी विमा भरला त्यापैकी १०७० लोकांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु ७२ तासाच्या निकषामुळे बरेच शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहिले.त्यामुळे विमा योजनेमध्ये पीक विम्याचा लाभ देण्यासाठी मंडळ घटक न धरता गाव हा घटक धरण्यात यावा. पर्जन्यमापक यंत्रणा ही प्रत्येक गावात असावी,त्यासाठी पुरेशी मनुष्यबळ यंत्रणा असावी. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांना प्रत्येकाला विमा मिळावा. कांबी हे गाव मुंगी मंडळातून काढून बोधेगाव मंडळात घ्यावे. कांबी गावचे कृषी सहाय्यक यांचा कारभार मनमानी व भेदभाव करणारा करणारा आहे म्हणून त्यांच्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो मोडला तर देश मोडेल. म्हणून शेतकरी संकटांमध्ये वाचला पाहिजे. जे चुकीचे निकष लावून शेतकऱ्यावर अन्याय करणे चालू आहे ते चुकीचे निकष बदलावेत.अन्यथा शेवगाव तालुक्यातील सर्व पीक विम्याच्या रकमेपासून वंचित शेतकरी आपल्या कार्यालयासमोर दि.२२ जुलै रोजी बोंबाबोंब आंदोलन करतील याची नोंद घ्यावी असेही सौ.काकडे म्हणाल्या.
चौकट – यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री. सुधाकर बोराळे साहेबांनी शेवगाव पाथर्डी शेतकरी कृती समितीने जो प्रस्ताव दिलेला आहे त्यातील काही त्रुटी महाराष्ट्रासाठी पथदर्शी असल्याचे सांगितले व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याकडे पिक विमा योजनेच्या त्रुटी दुरुस्ती करण्याबाबत शासनापुढे प्रस्ताव मांडण्याचे मान्य केले.तसेच सदर पीक योजनेतील त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल कृषी अधीक्षकांनी कृती समितीचे अभिनंदन देखील केले. याबाबत सकारात्त्मक चर्चा होऊन शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही,अशी हमी त्यांनी दिली.यावेळी ओरिएंटल इन्शुरन्स चे विभागीय व्यवस्थापक श्री.सुहास थूल,ॲक्सिस बँक,व इतर विमा कंपन्यांचे अधिकारी,श्री.राम पावडे विभागीय व्यवस्थापक,अ.नगर तालुका कृषी अधिकारी श्री.ए.एल.टकले,श्री.नरहरी शहाणे,श्री.गणेश सानप,श्री.बाबासाहेब गर्जे उपस्थित होते.यावेळी गाव पातळीवर शेतकऱ्यांशी चुकीचे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडसावले तसेच परिणामी फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही दिला.