शेवगाव प्रतिनिधी-निकेत फलके
आबासाहेब काकडे शिक्षण समूहाअंतर्गत दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग या शिक्षण संस्थेचे शेवगाव येथे श्री संत गाडगे बाबा चौकात विद्यानगरी कॅम्पसमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या वरिष्ठ महाविद्यालयास महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एनजीसी- २०२१/(१८५) मशि-४, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. या मान्यतेचे तसेच नवीन महाविद्यालयाचे संपूर्ण शेवगाव तालुक्यातील विविध स्तरांमधून सर्वत्र स्वागत होत आहे.
शेवगाव मध्ये विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी कॉम्रेड आबासाहेब उर्फ जगन्नाथ कान्होजी काकडे यांनी सन १९६९ मध्ये पुणे विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे त्यावेळी एफ. डी. एल या संस्थेऐवजी दुसऱ्या संस्थेला वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजेच तब्बल ४२ वर्षापासूनच्या आबासाहेबांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला या महाविद्यालायाच्या रूपाने एक मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.आपल्या शिक्षण समूह अंतर्गत शेवगाव येथे अगदी प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे विविध शाखांमधून दिले जात आहे. परंतु संस्थेअंतर्गत वरिष्ठ महाविद्यालय चालवले जात नाही ही हूरहूर सातत्याने आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे प्रमुख ॲड. विद्याधर काकडे आणि जिल्हा परिषद सदस्या (लाडजळगाव गट) व नियोजन मंडळ सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांना लागुन राहिलेली होती.
२१ व्या शतकाचा झपाट्याने बदलत चाललेला प्रवाह लक्षात घेऊन पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी स्वावलंबी होण्यासाठी शेवगाव शहरामध्ये या महाविद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, विद्यार्थी हा रोजगारभिमुख तसेच महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान भिमुख अध्यापन-अध्ययन प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपले करिअर घडविता यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यवस्थापनाने हे महाविद्यालय सुरू केलेले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनुभवी व तज्ञ प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग नियमित उपस्थित आहे. विद्यार्थी वर्गामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी या हेतूने महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेचे अद्यावत स्वरूपाचे एकूण पाच हजार संख्येचे क्रमिक व संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच रसायन शास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांच्या सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दैनंदिन अध्ययनाबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. वाणिज्य शाखेअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅली हा कोर्स मोफत स्वरुपात उपलब्ध करून दिलेला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या क्रीडा क्षेत्रातील संधी ओळखून व्यवस्थापनाने महाविद्यालयासाठी अद्ययावत व्यायाम शाळा आणि भव्य क्रीडांगण उपलब्ध करून दिलेले आहे. हे महाविद्यालय शेवगाव शहरामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे एक व्यासपीठ म्हणून अगदी थोड्याच कालावधीत नावारुपाला येणार आहे. शेवगाव शहरामध्ये अस्तित्वतात असलेल्या इतर संस्थेंच्या दोन वरिष्ट महाविद्यालायांपेक्षा हे महाविद्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून परिसरातून ये जा करण्यार्या विद्यार्थ्यांना प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे आहे. त्याचबरोबर हे महाविद्यालय संस्थेच्या आणि एकंदरीत आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचे असल्याकारणाने विद्यार्थ्यांना सर्व सोईयुक्त दर्जेदार उच्चशिक्षण देण्याचा व्यवस्थापनाचा सर्वोतोपरी पर्यंत असणार आहे असे प्रतिपादन शिक्षण समूहाचे प्रमुख ॲड. विद्याधर काकडे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश या महाविद्यालयात निश्चित करावा असे आवाहन व्यवस्थापन मंडळाकडून केले जात आहे. या महाविद्यालयास मान्यता मिळवून देण्यासाठी ॲड. विद्याधर काकडे, सौ. हर्षदाताई काकडे, प्रा. लक्षणराव बिटाळ, प्राचार्य डॉ. एम.के. फसले आदि यांनी विशेष परिश्रम घेतले.