अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिक नगर येथील श्री मार्कंडेय विद्यालय मधील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था व विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते शाळेत प्रथम- सागर अण्णासाहेब फुलारे (92.20 टक्के), द्वितीय- ऋतुजा योगेश सुग्गम (90.60 टक्के) व तृतीय- प्रज्ञा लक्ष्मीकांत नल्ला (90.20 टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, कष्टकरी श्रमिकांच्या मुलांनी कोरोना पार्श्वभूमी असताना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीतून जे यश संपादन केले ते खरे कौतुकास्पद आहे. ऑलम्पिक स्पर्धेत यश संपादन करणारे सर्व खेळाडू संघर्षातून यशस्वी झाले आहेत. या व्यक्तीमत्वांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश निश्चित मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. प्रास्ताविकात माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वतःच्या इच्छेनुसार आवड असलेल्या क्षेत्राची निवड करण्याचे आवाहन केले. यावेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्था पदाधिकारी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.