अंगारकी चतुर्थीनिमित्त उद्योजक रवी बक्षी व सौ.सुनिता बक्षी यांच्यावतीने रु. 1 लाख रोख व सोन्याची चेन श्री विशाल गणेशास अर्पण
श्री गणेशाची सेवा केल्याने जीवनात आनंद निर्माण होतो – उद्योजक रवी बक्षी
नगर – प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पुजनाने होत असते. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश याग पुजेतून मोठे समाधान मिळाले आहे. मनोभावे श्री गणेशाची सेवा केल्याने आपल्या जीवनात आनंद निर्माण होत आहे. श्री विशाल गणेश मंदिराचा झालेला जिर्णोद्धार व विकास हा नेत्रदिपक असाच आहे. तसेच देवस्थानचे उपक्रम व देत असलेल्या सेवा-सुविधांमुळे मंदिराची प्रचित सर्वदूर पोहचत आहे. त्यामुळे भाविकांची संख्याही वाढत आहे. मंदिर कार्यात आपले नेहमीच सहकार्य राहिले आहे, आज आमच्या परिवाराच्यावतीने मंदिर सुशोभिकरणास रु. 1 लाख रोख व एक सोन्याची चेन श्री विशाल चरणी अर्पण केली असल्याचे प्रतिपादन उद्योजक रवी बक्षी यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त उद्योजक रवी बक्षी व सौ.सुनिता बक्षी यांच्या हस्ते गणेश याग संपन्न झाला. याप्रसंगी देवस्थानच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, प्रा.माणिकराव विधाते, गजानन ससाणे, विजय कोथिंबीरे, नितीन पुंड, राजेंद्र एकाडे, उद्योजक जनक आहुजा आदि उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष अभय आगरकर म्हणाले, श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने भाविकांना जास्तीत-जास्त सुविधा देण्यात येत आहे. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आला आहे, तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज गणेश याग आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थांच्यावतीने नियोजन करुन त्यांच्यासाठी सर्वोतोपरि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मंदिर कार्यात उद्योजक रवी बभ व सौ. सुनिता बक्षी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार केल्याचे, अॅड.आगरकर यांनी सांगितले.
याप्रसंगी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी देवस्थानच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शेवटी प्रा.माणिक विधाते यांनी आभार मानले. चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.