श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त केडगावात मिरवणूक
तीन दिवसीय कार्यक्रमाची भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त केडगाव परिसरातून भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भाविकांसह महिला वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. स्वामी समर्थ मित्र मंडळ आणि महिला सेवेकरी परिवाराच्यावतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केडगावच्या बालाजी कॉलनीत तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भजन संध्या, अक्षय मुडावदकर यांचे व्याख्यान आणि परिसरातून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरची मिरवणुकीचे स्वामी समर्थ चौकातून प्रारंभ झाले. बालाजी कॉलनी, अंबिकानगर आदी परिसरातून निघालेली मिरवणुक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भाविकांनी मिरवणुकीतील पालखीचे दर्शन घेतले. केडगाव वेस येथे महिलांनी रिंगण सोहळा करुन स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष केला.
नेप्ती रोड मार्गे मिरवणुक पुन्हा बालाजी कॉलनीतून स्वामी समर्थ चौक या ठिकाणी पोहचल्यानंतर भक्ती गीतांवर भाविकांनी ठेका धरला होता. तर महिलांनी फुगडी खेळल्या. मिरवणुकीच्या समारोपनंतर श्री स्वामी समर्थ यांची आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.