सत्तापेंढारी यांचा सत्तेतून पायउतार करण्यासाठी डिच्चू कावा तंत्र
लोकभज्ञाकशाहीचा अवलंब करण्यासाठी लोकभज्ञाक मोहिमेला सर्व स्तरातून प्रतिसाद
चांगले दिवस आणण्यासाठी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीशिवाय पर्याय नाही -ॲड. गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- संसदीय लोकशाहीमध्ये राजकारणाचा धंदा करणाऱ्या सत्तापेंढारी यांचा सत्तेतून पायउतार करण्यासाठी डिच्चू कावा तंत्राचा वापर करुन लोकभज्ञाकशाहीचा अवलंब करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने सुरु केलेल्या लोकभज्ञाक मोहिमेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृती निर्माण करुन सत्तापेंढारी यांना धडा शिकवला जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
सत्तापेंढारी हे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा कामाशिवाय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सत्तापेंढाऱ्यांनी लोकशाहीला कर्कासुर होऊन दगा फटका केला आहे. या कर्कासुरांनी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पैशाच्या जोरावर मतकोंबाड अशी नवी जात तयार केली आहे. त्याशिवाय मध्यमवर्गीय आणि शिकलेल्या लोकांनी मला काय त्याचे, असे म्हणून ढबुमकात्या असा नवीन वर्ग तयार केला आहे. त्यामुळे सत्ता पेंढाऱ्यांना मागच्या दाराने सत्ता मिळवणे सोपे झाले आहे. यावर जालीम उपाय म्हणून डिच्चू कावा हे लोकअस्त्र लोकभज्ञाक चळवळीने तमाम मतदारांना उपलब्ध केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाश्चिमात्य समाजाने चंगळवाद पोसला आणि भारतीयांनी हा चंगळवाद पोसण्यासाठी भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवा टोलवी यांचा वापर केला आहे. भारतीयांनी पूर्वीपासूनच मोक्ष मिळवण्यासाठी आणि पुरुषार्थ साधण्यासाठी विश्वातील महान शक्तीची भक्ती आजपर्यंत चालू ठेवली. त्यातून समाजाच्या हितापेक्षा पश्चिमेकडीचे संस्कृतीने भौतिक स्वार्थ साधला, तर पूर्वेकडच्या संस्कृतीने अध्यात्मिक स्वार्थ जोपासला. परंतु महात्मा गांधीजींनी या दोन्ही मार्गापेक्षा गौतम बुद्धांचा मध्यम मार्ग स्वीकारून सजीव आणि लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याची भक्ती केली. त्यातूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. या देशातील सत्तापेंढारी पद्धतीच्या लोकशाहीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी लोकभज्ञाकशाही आणण्यासाठी पर्याय नसल्याचे म्हंटले आहे.
लोकध्यानाय शरणम गच्छामी…, ज्ञानाय शरणम गच्छामी…, कर्माय शरणम गच्छामी…! या मंत्राचा वापर लोकभज्ञाक चळवळीने सुरू ठेवला आहे. सजीवांसाठी आणि देशबांधवांसाठी केलेल्या कार्यातून आपला अनुभव आणि ज्ञान वाढते. या अनुभवाचा फायदा लोक कल्याणासाठी केल्यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मतदारांना पैसे वाटून किंवा जातीच्या नावावर मते मागून लोककल्याण कधीच होऊ शकणार नाही. आजही प्रत्येक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टया आहेत. 10 वर्षात कोट्यावधी लोकांना घरे देण्याचे आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करता आलेली नाही. एकंदरीत लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे लोकप्रतिष्ठा आणि संपत्ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जनता आपल्या हक्काविषयी उदासीन आहे. त्यामुळे या देशाला अतिशय चांगले दिवस आणण्यासाठी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती याशिवाय काही एक पर्याय नसल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
देशातील प्रत्येक शिक्षण संस्था ही ज्ञानमंदिर झाले पाहिजे. ज्या ठिकाणी आपण काम करतो, त्याचे रूपांतर कर्म मंदिरात केले पाहिजे. तरच 21 व्या शतकाच्या मध्याला आपण माणूस म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा आनंद मिळवू शकणार आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म या तीन अध्यात्मिक मार्गांचा वापर धर्मनिरपेक्ष पद्धतीने भारताचे संविधान राबविण्यासाठी आणि कायद्याचे राज्य आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जगभर मार्क्सवाद, समाजवाद, भांडवलशाही इत्यादी पद्धतीचा आग्रह धरण्यात आला. परंतु लोकभज्ञाक वाद याला काही एक पर्याय नाही. माणूस म्हणून राहण्यासाठी या पद्धतीशिवाय जगामध्ये दुसरी कोणतीही तत्त्वप्रणाली नाही. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला लोकभज्ञाक वाद नाकारण्याचे काहीएक कारण नसल्याचे म्हंटले आहे. लोकभज्ञाक चळवळीचा विस्तार व्यापक करण्यासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, ओम कदम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.