समझोता तरुण मंडळाच्या हनुमान चालिसा व भजन संध्याने भाविक मंत्रमुग्ध
निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आली आरती
नगर – समझोता तरुण मंडळाच्यावतीने सामुहिक हनुमान चालिसा पठण व भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ.निलेश लंके यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, शहर बँकेचे संचालक शिवाजीराव कदम, माजी महापौर सुरेखा कदम, मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी आदिंसह भाविक उपस्थित होते.
यावेळी संभाजी कदम म्हणाले, भगवान हनुमान शिवाचा अवतार मानले जाणारे असून स्वत: जय हनुमान हे उर्जा आणि शक्तीचे प्रतिक मानले जातात. त्यांची मनोभावनेने पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात सुख,समृद्धी नांदते आणि सर्व संकटे, दु:ख दूर होतात. गेल्या महिन्याभरापासून शहरात सुरु असलेल्या हनुमान चालिसा कार्यक्रमाने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. समाझोता तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान चालिसा होत असते. भाविकांचा मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद हा उत्साह वाढविणारा आहे.
आ.निलेश लंके म्हणाले, वीर हनुमान हे रामाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे शक्तीची देवता म्हणून देखील जय हनुमान ओळखले जातात. हनुमान चालिसा पठाणाने मनुष्यामध्ये सकारात्मक बदल होत असतात. त्यामुळे त्यांची दु:ख नाहिसे होऊन, जीवनात सुख-समाधान निर्माण होत असते. समझोता मंडळाच्या या धार्मिक उपक्रमाने श्रीराम भक्त व हनुमान भक्तांमध्ये उत्साह वाढत असल्याचे सांगितले.
मंगलभक्त सेवा मंडळाच्यावतीने या हनुमान चालिसामध्ये गायिलेल्या भक्तीगीतांने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कदम यांनी सर्वांचे स्वागत करुन आभार मानले.
- Advertisement -