केडगावमधील ओऍसिस इंग्लिश मिडियम स्कूलच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन
अहमदनगर प्रतिनिधी – भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीने केडगाव उपनगरातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार इंग्लिश मिडियम स्कूल सुरु करून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ओऍसिस इंग्लिश मिडियम स्कूलने स्थापनेपासून शैक्षणिक गुणवत्ता राखून अनेक विद्यार्थी घडविले आहेत.
एका छोट्या वृक्षाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले असून सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त अशी केडगावमधील ही पहिलीच शाळा आहे. शाळेचे उत्तम नूतनीकरण करण्यात आले असून क्रीडांगणही चांगले आहे. शाळेच्या विविध उपक्रमांना नेहमीच सहकार्य करू, अशी ग्वाही आ.संग्राम जगताप यांनी दिली.
केडगाव उदयनराजेनगर येथील ओऍसिस इंग्लिश मिडियम स्कूलच्या नूतनीकृत इमारतीचा व शाळेत आयोजित क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमास भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सुरेखाताई कोतकर, सचिव रघुनाथ लोंढे, संस्थेच्या संचालिका वैशाली कोतकर, प्राचार्या शोभा भालसिंग, सचिन कोतकर, मनोज कोतकर, सुनिल कोतकर, ज्ञानदेव बेरड आदी उपस्थित होते.
वैशाली कोतकर म्हणाल्या की, संस्थेचे संस्थापक भानुदासजी कोतकर यांनी सर्वसामान्यांच्या मुलांना चांगले दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी शाळेची स्थापना केली.सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेचा नावलौकिक वाढला आहे. आता नूतनीकृत इमारतीतून विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
सचिव रघुनाथ लोंढे यांनी संस्थेची स्थापनेपासूनची वाटचाल मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्राचार्या शोभा भालसिंग म्हणाल्या की, करोना काळात शाळा बंद असतानाही ऑनलाईन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम चालूच ठेवले.आता शाळा पूर्ण खुल्या झाल्या असून नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले.स्वागत काशिफ खान यांनी केले.पांडुरंग गवळी यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.