अहमदनगर प्रतिनिधी – ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे . त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे आज राज्यमंत्री कू. तटकरे यांनी श्री. हजारे यांची भेट घेतली.यावेळी आमदार निलेश लंके, राजेन्द्र फाळके, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी श्री. हजारे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. राळेगण सिद्धीचा विकासाची माहितीही त्यांनी घेतली. सार्वजनिक जीवनात अण्णांचे काम आणि योगदान खूप मोठे आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येतानाच अण्णांना भेटायचे ठरवले होते. त्यांचा आमच्या कुटुंबीयांशी स्नेह आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीने नवीन ऊर्जा मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अण्णांचे सार्वजनिक क्षेत्रातील काम आमच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी राळेगण सिद्धीला आल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी अण्णांनी माजी मंत्री तथा सध्याचे खासदार सुनील तटकरे यांच्याशीही दूरध्वनी वरून संवाद साधला आणि कौटुंबिक स्नेहाला उजाळा दिला. ***