सावेडीत अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीची रंगली शोभायात्रा
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित मिरवणुकीने वेधले लक्ष
येळकोट येळकोट जय मल्हार… व आहिल्यादेवींच्या जय घोषाने परिसर दणाणला
केंद्रात पुन्हा सरकार आल्यावर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अहिल्यादेवी यांच्या नावावर
शिक्कामोर्तब होणार – आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त सावेडी उपनगरात उत्कर्ष फाउंडेशन व विचार भारती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित पारंपारिक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शुक्रवारी (दि.31 मे) निघालेल्या मिरवणुकीने येळकोट येळकोट जय मल्हार… च्या घोषणांनी व आहिल्यादेवींच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
नंदूरबार, सांगली, अकोले येथून आलेल्या कलाकारांनी आदिवासी होळी नृत्य, धनगरी ढोल पथक (गजी नृत्य), आदिवासी फुगडी, गौरी, टिपरी व कांबड नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. घोड्यांच्या रथातील बग्गीत असलेली अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती व त्यांच्या वेशभुषेतील महिलेने सर्वांचे लक्ष वेधले.
सकाळी 7 वाजता श्रीराम चौकातून या शोभायात्रेचे प्रारंभ झाले. भिस्तबाग चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, शारदाताई ढवण, दिपालीताई बारस्कर, मीना चव्हाण, निखिल वारे, उत्कर्ष फौंडेशनचे डॉ. अशोक भोजने, इंजि.डी.आर. शेंडगे, डॉ. राहुल पंडित, प्रा. बाळासाहेब शेंडगे,भिसे, चंद्रकांत तागड, डॉ.सचिन सोलाट, सचिन भोजने, डॉ.तागड, डॉ.महेंद्र शिंदे, वडीतके सर, डॉ.अविनाश गाडेकर, डॉ.विरकर, डॉ. हंडाळ, नानासाहेब देशमुख, सागर पदीर, विचार भारतीचे रवींद्र मुळे, बलभीम पठारे, अनिल मोहिते, अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजू तागड, अनिल ढवण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या डॉ. मीनाक्षी करडे, डॉ. उषा शेंडगे, डॉ. पुनम भोजने, सौ. भिसे, अश्विनी शेंडगे, ज्योती भोजने, डॉ. रणजीत सत्रे, शिवाजी डोके, कांतीलाल जाडकर आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून भिस्तबाग चौकाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले. तर जिल्ह्याच्या नामांतरासाठी आग्रही भूमिका घेऊन राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अहिल्यादेवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर अहिल्यादेवी होळकर यांनी स्वकर्तृत्वाने या जिल्ह्याच्या भूमीतून देशात नाव उज्वल केले. 250 वर्षांपूर्वी त्यांनी मोठा लढा उभा केला. त्यांचे संघर्षमय जीवन सर्व महिलांना व युवकांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या रुपाने आई तुळजाभवानीच्या देवी शक्तीचा साक्षात्कार सर्वांना घडल्याचे त्यांनी सांगितले.
संपत बारस्कर यांनी एका महान कर्तृत्ववान स्त्रीचे शहराला नाव दिले जात आहे. हे सर्व नगरकरांचा अभिमान आहे. लवकरच सर्वांच्या स्वप्न असलेले नामांतरावर केंद्र सरकारकडून मान्यता मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ.अशोक भोजने यांनी जिल्ह्याच्या नामांतरासाठी प्रयत्नशील असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळाचे अभिनंदन व्यक्त केले. इंजि.डी.आर. शेंडगे यांनी जिल्ह्याचे नामांतर ही अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीची सर्व समाजबांधवांना भेट ठरणार असून, जिल्ह्याचा नवीन इतिहास व अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची गाथा देशभर पसरणार असल्याचे सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,भिस्तबाग चौकातून शोभायात्रा प्रोफेसर चौकाकडे मार्गस्थ झाली. यावेळी चौका-चौकात आदिवासी कला-नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. प्रोफेसर चौकात या शोभायात्रेचा समारोप झाला. मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या.