भगवान महावीर यांच्या जीवनाचे सार म्हणजे तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा व सदाचार – विसोही दर्शनाजी म.सा.
अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
जैन धर्माचे चौविसावे तीर्थंकार भगवान महावीर हे अहिंसेचे मूर्तीमंत प्रतिक होते. जन्म-मृत्यूच्या वेगवान प्रवाहात मानवाला सर्वश्रेष्ठ मानव धर्माचे दर्शन घडवून त्यांच्या जीवनाचे सार म्हणजे तप, त्याग, संयम,प्रेम, करुणा व सदाचार हे होते. त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.त्यांचे जीवन म्हणजे ज्ञानवीर कर्मवीर व धर्मवीर असे त्रिवेणी संगमाचे होते, असे मौलिक विचार प.पू. महासतीची विसोही दर्शनाजी म.सा.यांनी केले.
सावेडी उपनगरात श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि श्री महावीर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवचा साजरा करण्यात आला. यावेळी धर्म प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी जैन धर्मस्थानकापासून श्री भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक परिसरातून काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन धर्मिय स्त्री-पुरुष पारंपारिक वेषात सहभागी झाले होते.महिलांनी डोक्यावर कलश घेऊन महावीर नामाचा जय जयकार करत होत्या. बॅण्ड पथक, भव्य सजविलेल्या रथातील भगवान महावीरांची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
पुढे बोलतांना धर्मप्रवचनात महासतीजी म्हणाल्या, भगवान महावीरांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणून त्याचे अनुकरण करावे. सावेडीकरांचा भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक सोहळ्यातील उत्साह पाहून महासतीजींना त्यांचे बालपण आठवले. येथून पुढे दरवर्षी शहरातील प्रत्येक परिसरात असेच आयोजन करावे. यामुळे धार्मिक कार्यात नागरिकांचा सहभाग वाढण्यास मदत होईल आणि लहान मुलांमध्ये धर्मभावना जागृत होईल, असे सांगितले.
या कार्यक्रमास माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला.
मिरणुकीची व्यवस्था निहार कटारिया, कुणाल गांधी, संदेश कर्नावट, श्री.छाजेड, श्री. पिपाडा, रुपेश संकलेचा यांनी पार पाडली. गौतमी प्रसादीची व्यवस्था अनिल गांधी, राहुल बलदोटा, शुभम गांधी आदिंनी केली होती. भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा मोठ्या आनंदाने लाभ घेतला.