मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी
ना. बाळासाहेब थोरात थोड्याच वेळात करणार घटनास्थळाची पाहणी – काळे
———————————————–
अहमदनगर प्रतिनिधी : ऐन भाऊबीजेच्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाला आग लागली. यामध्ये दहा रुग्ण जळून मृत्युमुखी पडले. या हृदयद्रावक घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, अशी मागणी शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
घटनेची माहिती समजताच किरण काळे यांनी काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चूडीवाला, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घटनास्थळाची पाहणी करत रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. घटना शॉर्टसर्किटमुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र घटनेची दाहकता पाहता फायर ऑडिट संदर्भामध्ये अनेक शंका असल्याचे यावेळी काळे यांनी म्हटले आहे. मृतांच्या नातेवाइकांना तातडीने मोठी आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ना.बाळासाहेब थोरात करणार घटनास्थळाची पाहणी – काळे
महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना घडलेल्या घटनेची माहिती आम्ही तात्काळ कळविली आहे. त्यांनी हळहळ व्यक्त केली असून आपण नगरला तातडीने येऊन घटनास्थळाची भेट घेऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ना.थोरात हे प्रत्यक्ष येऊन घटनास्थळाची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.
- Advertisement -