नियमित व्यायाम ही निरोगी आयुष्याची गुरूकिल्लीच – डॉ. अमित भराडिया
अहमदनगर प्रतिनिधी – समीर मन्यार
प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी दिवसातून किमान स्वतःसाठी 20 मिनिटे किंवा आठवड्यातून किमान पाच दिवस वेळ काढा. या वेळेत व्यायाम करा, योगा करा, प्राणायाम करा. हे तुमच्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हृदयरोगापासून दूर रहायचे असेल, तर प्राणायाम व व्यायामाशिवाय पर्याय नाही. नियमित व्यायाम ही निरोगी आयुष्याची गुरूकिल्लीच आहे, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित भराडिया यांनी केले.
जागतिक हृदयरोग दिनानिमित्त शारीरिक स्वास्थ्यासाठी व हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी सुरभि हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्राणायाम करीत नियमित व्यायाम केला. यावेळी सुरभि हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित भराडिया बोलत होते.
याप्रसंगी हॉस्पिटलमधील डॉ. राकेश गांधी, डॉ. अमित पवार, डॉ. आशिष भंडारी, डॉ. श्रीतेज जेजूरकर, डॉ. प्रियन जुनागडे, डॉ. वैभव अजमेरे, डॉ. विलास व्यवहारे, डॉ. अजित ठोकळ, डॉ. सुलभा पवार आदी उपस्थित होते.
डॉ. भराडिया म्हणाले की, दररोज हजारो नागरिक हाटॅअॅटॅकची शिकार होतात. त्यामुळे आपण आपल्या हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. २९ सप्टेंबर हा दिन जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपले हृदय निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. बदलती जीवनशैली हृदयरोगास कारणीभूत ठरते आहे. खाण्यापिण्याविषयी विशेष काळजी घ्यावी.
फास्टफुडकडे तरुण-तरुणी त्याकडे आकर्षित होत असले, तरी यापासून दूर राहणे तुमच्या आमच्या प्रत्येकासाठी फायद्याचेच आहे. फास्टफुडमुळे अनेक आजार बळावण्याचा धोका असतो. यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.
डॉ. राकेश गांधी म्हणाले की, हृदयरोगाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने २९ सप्टेंबर हा दिन हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. सुरभि हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर संचालकांनी समाजाला संदेश मिळावा, यासाठी प्राणायाम व योगा केला. प्रत्येकाने वयाची तिशी ओलांडल्यानंतर स्वतःची विशेष काळजी घेणे व वेळच्या वेळी तपासण्या करून घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.