सुवर्णा ठोकळ यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अबॅकसच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- एव्हरेस्ट अबॅकसच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या सुवर्णा निखिल ठोकळ यांना दिशाशक्ती समुहाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. राहुरी येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात राहुरीचे आमदार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती बाचकर महाराज यांच्या हस्ते ठोकळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुवर्णा ठोकळ या सुपा येथे एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अबॅकसचे धडे देत आहेत. अबॅकस फक्त श्रीमंत घरातील मुलांपुरते मर्यादीत न राहता शेतकरी कुटुंबातील मुलांना ते ज्ञान मिळण्यासाठी 2016 पासून त्या योगदान देत आहेत. 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्याकडे अबॅकसचे शिक्षण घेत असून, त्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे. सुशिक्षीत बेरोजगार महिलांसाठी देखील त्या योगदान देत असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दिशाशक्ती समुहाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी देखील सुवर्णा ठोकळ मॅडम यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले असून, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.