श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्यावतीने अभिवादन
स्त्री शिक्षणाचे श्रेय महात्मा फुले यांचेच -बाळासाहेब बोराटे
नगर – बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी निश्चय केला. पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा स्थापन केली. यानंतर जोतिबांनी अनेक शाळा सुरू केल्या व समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतरच स्त्रीया शिक्षित होऊन अनेक क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविला. याचे खरे श्रेय महात्मा ज्योतीबा फुले यांना जाते. त्यांच्या विचारांवर श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करत असल्याचे प्रतिपादन सावताश्रम शिक्षण संस्थेचे चेअरमन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय यांच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बोराटे, सचिव प्रा.सुनिल जाधव, दत्ता जाधव, परेश लोखंडे, मुख्याध्यापक राजकुमार शिंदे, राजीव घोलप आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी प्रा.सुनिल जाधव म्हणाले, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हे ओळखून स्त्री शिकली तर सर्वच कुटूंब शिक्षित होईल, या उदात्त भावनेने महात्मा ज्योतीबा फुले यांनी केलेले कार्य आजच्या शिक्षित झालेल्या समाजातून दिसून येत आहे. त्यांचे हेच कार्य त्यांच्या नावाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले शाळेच्या माध्यमातून पुढे चालविले जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात मुख्याध्यापक राजकुमार शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. शेवटी राजीव घोलप यांनी आभार मानले