सामाजिक कार्यातून मिळणारा आनंद काही औरच : घुले
अहमदनगर प्रतिनिधी – व्यवसाय सांभाळून समाजातील गोरगरीब व अनाथांसाठी काम करणे हा स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा छंद आहे. सामाजिक कार्याला वाहून घेताना मिळणारा आनंद काही औरच असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी गोरगरीब व अनाथांसाठी करत असलेल्या कामाबद्दल घुले यांनी स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, सभापती काशिनाथ दाते उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा घुले म्हणाल्या, माणसे जोडणे, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे यामुळे शिंदे यांचा मित्र परिवार वाढत गेला. फोटोग्राफी च्या माध्यमातून सामाजिक कार्य हे आणखी वाढले.
शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात वावरताना ते अजातशत्रू म्हणून वावरत आहेत. त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शेळके यांनीही उद्धव शिंदे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेने केलेला गौरवाबद्दल शिंदे यांनी अध्यक्षा घुले, उपाध्यक्ष शेळके व मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांचे आभार मानले.