‘त्या’ चिमुकल्यांनी प्रथमच अनुभवला बालदिन
अहमदनगर प्रतिनिधी – आज देशभर मोठ्या उत्साहात बालदिन साजरा होत आहे.अनेक शाळांमध्ये,घरोघरी लहान मुलांचे कौतुक सुरू आहे.परंतु, समाजात अद्यापही अशी मुले आहेत,ज्यांना बालदिन म्हणजे काय? हे माहीत नाही.त्यामुळे गरिब मुलांनाही बालदिनाचा आनंद घेता यावा, यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने सावेडीतील रासनेनगर भागात गरिब मुलांसोबत बालदिन साजरा करण्यात आला.
येथील चिमुरड्यांना फुगे, खाऊचे वाटप केले.यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.आजच्या या कार्यक्रमात चिमुकल्यांनी वेगळीच अनुभूती घेतली. त्यांच्या निरागस हास्याने येथील वातावरण अधिकच खुलून गेले होते.
याप्रसंगी “स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे, वैद्य विकास शिंदे, संकेत शेलार, अनिकेत येमूल, गणेश चौकटे उपस्थित होते. समाजातील प्रत्येक लहान मुल जेव्हा शिक्षित होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक विकास होईल, असा संदेश यानिमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशनने दिला.
यावेळी मुलांना खाऊ वाटप करून हवेत फुगे सोडण्यात आले. या उपक्रमाबद्दल या मुलांच्या पालकांनी स्नेहबंध फाउंडेशनचे आभार मानले.