अहमदनगर प्रतिनिधी – कोरोना काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबीराच्या माध्यमातून अनेक गरजूंवर मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर विविध मोफत आरोग्य शिबीर व गरजू घटकांना किराणा, अन्न-धान्य वाटप उपक्रम राबवून सर्वसामान्यांना आधार देण्यात आला. या सामाजिक कार्याची दखल घेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचे कौतुक केले.
शहरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आले असता, फिनिक्स फाऊंडेशनचे जालिंदर बोरुडे यांनी त्यांची भेट घेऊन संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. फिनिक्स सोशल फाऊंडेशनने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकांना आधार दिला आहे.
फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबीराच्या माध्यमातून अनेकांवर मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोरोनाने सर्वसामान्यांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला होता. मोठ-मोठे हॉस्पिटल सेवा देत असताना आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जाणे देखील शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये फिनिक्स फाऊंडेशनने मोफत शिबीर राबविले.
तसेच नेत्रदान, अवयवदानबद्दल जनजागृती केली. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी संस्थेच्या माध्यमातून नेत्रदानाचा संकल्प केला, तर त्यांचे संकल्प अर्ज देखील संस्थेच्या वतीने भरुन घेण्यात आले असल्याचे बोरुडे यांनी माहिती देताना सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सामाजिक भावनेने कोणतेही अनुदान न घेता,पदरखर्चाने फिनिक्स फाऊंडेशन करत असलेल्या मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.तर ही सेवा अविरत सुरु राहण्यासाठी मार्गदर्शन केले.