विधी सायन्स अकॅडमी व सातारा येथील स्मार्ट एज्युकेशन मध्ये सामंजस्य करार
अहमदनगर प्रतिनिधी – डॉक्टर बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्थेच्या विधी सायन्स अकॅडमीच्या वतीने मागील वर्षापासून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर गायडन्स विषय सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे.त्याचेच पुढचे पाऊल म्हणून संस्थेने सातारा येथील स्मार्ट एज्युकेशन सोबत सामंजस्य करार करण्यात आला.यावेळी सातारा येथील स्मार्ट एज्युकेशन च्या प्रतिनिधी सौ वंदना कुलकर्णी,संस्थेचे सचिव प्राध्यापक विजय शिंदे,सागर वानखेडे,सौ.प्रिती वानखेडे यावेळी उपस्थित होते.
या करारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम पणे परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मदत होणार आहे.सातत्याने ऑनलाइनचा होत असलेला परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांना स्वअध्यायन करणे अवघड जात आहे.ती सवय यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांना आवडू लागेल याचा आम्हाला विश्वास आहे.
स्मार्ट एज्युकेशन मागील अकरा वर्षांपासून सातत्याने नवनवीन प्रयोग करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.यामध्ये दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्व अभ्यास एकत्रितपणे कसा करता येईल व त्याविषयी असणारे उपयुक्त प्रश्न व त्याची उत्तरे याची सविस्तर नोंद स्मार्ट एज्युकेशन ने तयार केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड व केंद्रीय परीक्षा बोर्ड यांचा विचार करूनच हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.यात विविध व्हिडिओज व एम सी क्यू चा समावेश करण्यात आलेला आहे.संस्थेच्या वतीने शासना कडून घेण्यात येत असलेल्या परीक्षेपूर्वी साधारण दोन महिने अगोदर अगदी सर्व नियम पाळून बोर्ड परीक्षे प्रमाणेच परीक्षा घेतली जाते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक कुवत किंवा आपण आणखी किती अभ्यास करणे गरजेचे आहे याची योग्य माहिती मिळेल.या परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना लगेचच पालकांसमवेत दिला जातो.ज्यामुळे पालकांना देखील आपल्या पाल्याने आणखी किती अभ्यास करणे गरजेचे आहे याचा अंदाज येतो.
या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी एकाच वेळेस परीक्षा देतात.याच बरोबर बोर्ड परीक्षेपूर्वी साधारण तीन उपयुक्त प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या मेल आयडीवर सरावासाठी पाठवल्या जातात याचा फायदा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या काळात होतो.या परीक्षेमधून पहिल्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली जातील.
यातील प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये, द्वितीय बक्षीस सात हजार, रुपये,तृतीय बक्षिस पाच हजार रुपये अशा पद्धतीने कमी कमी होत एकूण दहा विद्यार्थ्यांना हे बक्षीस दिले जाते.अशी माहिती स्मार्ट एज्युकेशन चे संस्थापक डी.वाय पवार व सुहास साळुंखे यांनी दिली.
विधी सायन्स अकॅडमी व स्मार्ट एज्युकेशन एकत्रितपणे अहमदनगर जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत संवाद साधून मार्गदर्शन करणार आहे.यासाठी विशेष मार्गदर्शन तज्ञांची आपल्याला मदत होणार आहे.जास्तीत जास्त पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ वैशाली शिंदे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 940 47 44 509 या क्रमांकावर संपर्क साधावा.