केडगावला किर्तन महोत्सवाला प्रारंभ
- देवाचे चिंतन करून आनंदाचे अलंकार परिधान केल्यास जीवन सुखी, समाधानी होणार -ह.भ.प. किशोर महाराज दिवटे
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्या निमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशनच्या (ट्रस्ट) वतीने आयोजित केलेल्या किर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. किर्तन महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.
किर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प स्व. सुभाष कोंडीराम वाघ यांच्या स्मरणार्थ ह.भ.प. किशोर महाराज दिवटे यांनी गुंफले. कीर्तनात दिवटे महाराज म्हणाले की, जीवनात समाधान पाहिजे असेल, तर देवाचे नाम चिंतन केले पाहिजे.स्वप्नात सुध्दा देवाचे नाम चिंतन झाले पाहिजे. त्याचा परिणाम आपल्या जीवनात समाधान, सुख मिळते. मनुष्य जेवताना आनंदाचे लाडू खाऊ लागतो. अंगावरचे कपडे सुध्दा आनंदाचे धारण केले. सर्व सुख, सर्व अलंकार लोक अंगावर परिधान करतात. त्यापेक्षा देवाचे चिंतन करून आनंदाचे अलंकार परिधान केल्यास जीवन सुखी, समाधानी होणार आहे व ते कायमस्वरूपी टिकणारे आहेत. देवाच्या चिंतनाने जिवनाची चिंता दूर होते. तसेच आपल्या जीवनात पापही शिल्लक राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक, महिला व ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.