शेवगाव प्रतिनिधी दि.(०४) तालुक्यातील मौजे जोहरापूर, खामगाव, हिंगणगाव या गावाचा महापुरामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी वरील गावातील ग्रामस्थांसमवेत म.रा.वि.वि.कं.उपविभाग शेवगावचे उपकार्यकारी अभियंता लोहारे एस.एम. यांना शेवगाव येथे दिले. यावेळी ॲड.शिवाजीराव काकडे, मोसिम पटेल, अनुमुद्दिन पटेल, विकारोद्दीन काझी, मोहीद्दीन पटेल, बिलाल काझी, आसिफ पटेल, बाबासाहेब देवढे उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे की, शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही गावात दि.३१ रोजीच्या मध्यरात्री ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे नद्यांना महापूर येऊन नद्यांचे पाणी काही गावांमध्ये शिरले होते. महापुरामुळे जोहरापुर, हिंगणगाव व खामगाव आदि गावांमधील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सदरची गावे अंधारात आहेत. वाड्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा बंद असल्याने जनावरांना, माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, घरात पीठ नाही. लोकांनी जगायचे कसे ? असा सवाल या गावातील ग्रामस्थांच्या समोर आवासून उभा आहे. त्यामुळे म.रा.वि.वि.मंडळाने याची दखल घेऊन वरील तीन गावांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा असेही निवेदनात म्हंटले आहे.